For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्रपतींनी स्वराज्य दिले, आम्ही सुराज्य करूया

11:55 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
छत्रपतींनी स्वराज्य दिले  आम्ही सुराज्य करूया
Advertisement

छत्रपती संभाजीराजे यांचे प्रतिपादन : येळ्ळुरात शिवमूर्ती लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात, हजारोंची उपस्थिती

Advertisement

येळ्ळूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे काम केवळ महाराष्ट्रापुरतेच नव्हते तर तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्यापर्यंत त्यांनी स्वराज्य स्थापन केले होते. आम्हाला त्यांनी स्वराज्य दिले आहे. आता ते सुराज्य कसे करता येईल हे पाहिले पाहिजे. स्वराज्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभिमान, संस्कार, सुसंस्कृतपणा, गनिमी कावा आणि गुप्तहेर याचा विचार आम्हाला त्यांनी दिला आहे. त्या संस्काराप्रमाणेच आम्ही वाटचाल केली पाहिजे’, असे प्रतिपादन  कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. येळ्ळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले आहे.

केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती उभे करून शिवशाही निर्माण होणार नाही तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान आपल्या अंगी बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आज 350 वर्षे पूर्ण होत आहेत. आमची 13 वी पिढी वावरत आहे. आम्हाला व समाजाला जो मान-सन्मान मिळत आहे तो केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे असल्याचे त्यांनी सांगितले. येळ्ळूरवासियांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जिवंत ठेवले, याचा मला सार्थ अभिमान असून येळ्ळूरवासीय तसेच हिंदवी स्वराज्य युवा संघटनेने केलेल्या कार्याचे त्यांनी तोंडभरून कौतुकही केले.

Advertisement

प्रमुख वक्ते आणि शिवचरित्र व्याख्याते डॉ. अमर अडके म्हणाले, येळ्ळूर गाव हे आज खरे शिवतीर्थ झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संजीवन मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. त्यामुळे आज येळ्ळूरच्या प्रत्येक घरामध्ये शिवाजी आल्यासारखे वाटले आहे. येळ्ळूर राजहंसगडाच्या इतिहासाबद्दल ते म्हणाले, या गडाच्या पायथ्याशी औरंगजेबाचा डेरा होता. गुलालबार असे नावही त्याच्या वजिराचे होते. असे सांगत या किल्ल्याचा इतिहासदेखील त्यांनी सांगितला आहे. सदर किल्ला हा बहामनी काळात बांधलेला असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे आहे. केवळ अफझल खानाचा वध आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचे प्रसंग सांगून उपयोग होणार नाही. तर त्यांच्या प्रत्येक किल्ल्याचा अभ्यास तरुणांनी करावा, यासाठी गडमोहीम काढून तरुणांनी शिवाजी महाराज समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. रामशेस नावाचा किल्ल्याचा इतिहासदेखील यावेळी त्यांनी सांगितला. संतिबस्तवाड येथील माळावर छत्रपती संभाजी महाराज फोंड्याला जाताना त्याठिकाणी वस्तीला होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले म्हणजे ते एक सामर्थ्य आहे. त्याकाळी जिजामाता यांनी स्वराज्यासाठी आर्थिक हातभार लावला तो वाखाणण्याजोगा होता.

ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांनी ग्रामस्थांनी केलेले सहकार्य याचबरोबर हिंदवी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत महाराष्ट्र चौकाचा निश्चितच विकास करू, असे आश्वासन त्यांनी दिले. येळ्ळूरमध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती दाखल झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राजे व डॉ. अमर अडके यांच्या हस्ते मूर्ती सोहळ्याचे उद्घाटन करत लोकार्पण करण्यात आले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी जोरदार घोषणा तरुणांनी देऊन संपूर्ण परिसर ‘शिवमय’ केला होता.

नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील, स्वामी विवेकानंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश वि. पाटील, मंगाई को-ऑप. सोसायटीचे चेअरमन सतीश शिवाजी पाटील, बि. कॉ. सतीश धामणेकर, प्रभाकर मंगनाईक, प्रकाश तोपिनकट्टी, माजी ता. पं. सदस्य रावजी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजुकर होते. चांगदेव मुरकुटे यांनी स्वागत केले. प्रा. सी. एम. गोरल यांनी आभार मानले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शिवप्रेमी व महिलांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.

ग्रंथालयाबद्दल केले कौतुक

हिंदवी स्वराज्य युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चौथऱ्याच्या खाली ग्रंथालय स्थापन केले. हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सांगत कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरील पुस्तके ठेवा, त्याचे वाचन करा आणि ते आचरणात आणा, असेदेखील त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.