मुस्लिम देशांमधून छांगूर बाबाला मिळाले 500 कोटी
नेपाळच्या मार्गे पोहोचला पैसा : धर्मांतरासाठी वापरली गेली रक्कम
वृत्तसंस्था/ बलरामपूर
जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबाला मागील 3 वर्षांमध्ये जवळपास 500 कोटीचा निधी विदेशातून प्राप्त झाल्याचा खळबळजनक खुलासा उत्तरप्रदेश एटीएसने शुक्रवारी केली आहे. यातील 200 कोटी रुपयांची रक्कम अधिकृत बँकिंग माध्यमातून भारतात पोहोचली तर 300 कोटी अवैध हवाला माध्यमाद्वारे नेपाळमधून भारतात पोहोचले. ही रक्कम मुस्लीम देशांमधून पुरविण्यात आली आहे. भारतात धर्मांतर घडवून आणण्याकरता ही रक्कम छांगूर बाबाला पाठविण्यात आली होती.
नेपाळच्या काठमांडू, नवलपरासी, रुपनदेही आणि बांके यासारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये 100 हून अधिक बँक खाती उघडण्यात आली, ज्यात पैसे जमा करण्यात आले. ही रक्कम पाकिस्तान, दुबई, सौदी अरेबिया आणि तुर्किये यासारख्या मुस्लीमबहुल देशांमधून आली होती. या खात्यांमधील रक्कम नेपाळमध्ये स्थानिक एजंटांच्या माध्यमातून भारतात पोहोचविण्यात आली. एजंट याकरता 4-5 टक्के कमिशन घेत होते. अनेकदा पैसे कॅश डिपॉजिट मशीनद्वारे जमा करण्यात आले असे एटीएसच्या तपासातून समोर आले आहे.
नेपाळमध्घ्tन भारतात आलेली रक्कम बलरामपूर, श्रावसती, बहराइच, लखीमपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक मनी एक्सचेंजर्सच्या माध्यमातून भारतीय चलनात बदलण्यात आले. बिहारच्या मधुबनी, सीतामढी, पूर्णिया, किशनगंज, चंपारण्य आणि सुपौल जिल्ह्यांमधील एजंटही या अवैध फंडिंग नेटवर्कमध्ये सामील असल्याचे चौकशीत आढळून आले.
अयोध्येत सर्वाधिक फंडिंग
एटीएसनुसार सर्वाधिक विदेशी फंडिंग अयोध्या जिल्ह्यात पोहोचले, जेथे कथित स्वरुपात हिंदू युवतींचे धर्मांतर करविण्यात आले. छांगूर बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित 40 बँक खात्यांची चौकशी सुरू झाली आहे. तपासादरम्यान नवीन रोहराच्या 6 बँक खात्यांमध्ये 34.22 कोटी तर त्याची पत्नी नीतू उर्फ नसरीनच्या बँक खात्यांमध्ये 13.90 कोटी रुपये मिळाल्याची पुष्टी झाली आहे. एटीएसने मागील 10 वर्षांचे प्राप्तिकर तपशीलही मागविले आहेत. छांगूर बाबाची दुबई, शारजाहमध्येही बँक खाती असावीत असा संशय व्यक्त होत आहे, यादृष्टीकोनातूनही तपास केला जात आहे.
अवैध बंगल्यावर बुलडोझर
बलरामपूर येथील छांगूर बाबाचा 5 कोटीचा बंगला पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आला आहे. बंगला सरकारी जमिनीवर अवैध स्वरुपात उभारण्यात आला होता. 40 खोल्या असलेल्या या महालवजा बंगल्यात मार्बलचे सुरक्षा गेट, विदेशी फर्निचर, सीसीटीव्ही कमांड रुप आणि आधुनिक सुविधा होत्या. बंगल्याला जमीनदोस्त करण्यासाठी 10 बुलडोझर तैनात करण्यात आले आणि तीन दिवसांच्या कारवाईत तो जमीनदोस्त करण्यात आला आहे. नीतू आणि नवीन तसेच त्यांच्या मुलीचेही छांगूर बाबाने धर्मांतर करविले होते. हे कुटुंबू छांगूर बाबाच्या धर्मांतर करविण्याच्या गुन्ह्यात सामील होते.