छगन भुजबळ आणि आमच्यात कोणतीही चर्चा नाही; भुजबळांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेशाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही आणि तशी चर्चा होण्याचीही शक्यता नसल्याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीवरून पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये फिरत आहेत त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीला राज्यामध्ये चांगल्या जागा मिळाल्या. नाशिकच्या जागेवर आमदार छगन भुजबळ आग्रही होते. पण जागावाटपात त्यांना जागा न मिळाल्याने तो विषय मागे पडला. त्यानंतर ते राज्यसभेवर जाण्यासाठीही इच्छुक होते पण ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरला. यावेळी छगन भुजबळ अनुपस्थित राहील्याने भुजबळ नाराज असल्याच्या एकच चर्चा उडाल्या. तसेच छगन भुजबळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचंही बोलल जात होतं.
याबाबत माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी याचा नकार दिला. ते म्हणाले, भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते. त्यांनी पक्ष सोडण्याला बराच काळ लोटला आहे. या प्रवासात आता सेनाही खूप पुढे गेली आहे. शिवसेना आणि भुजबळ यांच्यात चर्चा सुरू असल्याच्या वृत्तांमध्ये अजिबात तथ्य नाही. आमच्यात कोणताही संवाद झालेला नाही आणि तशी शक्यताही नाही" असा खुलासाही त्यांनी केला.