चेतेश्वर पुजाराचे 18 वे द्विशतक
प्रथम श्रेणीमध्ये विक्रमी कामगिरी
वृत्तसंस्था/ राजकोट
रणजी क्रिकेटमध्ये सौराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यात झालेल्या सामन्यात चेतेश्वर पुजाराने द्विशतक ठोकले आहे. भारताचा भरवशाचा फलंदाज म्हणून ओळख असलेला पुजारा गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय संघापासून दूर आहे. रणजी चषक स्पर्धेत छत्तीसगडविरुद्ध लढतीत पुजाराने 18 वे द्विशतक झळकावले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करणारा पुजारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तामिळनाडूविरूद्धच्या सामन्यात पुजारा अपयशी ठरला होता, मात्र छत्तीसगडविरुद्ध लढतीत पुजाराने 383 चेंडूत 234 धावा केल्या. यामध्ये 25 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुजाराने 18 वे द्विशतक ठोकत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक द्विशतके करणारा पुजारा जगातील चौथा तर भारताकडून सर्वाधिक द्विशतके करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याशिवाय, या सामन्यादरम्यान त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 21000 धावांचा टप्पा पूर्ण केला . प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीमध्येही चौथ्या स्थानी पोहोचलय. यादीमध्ये सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड असून चौथ्या स्थानी चेतेश्वर पुजाराचा क्रमांक लागतो. सुनील गावसकर या यादीमध्ये पहिल्या स्थानावर असून त्यांनी 25,834 धावा केल्या आहेत.
दरम्यान, छत्तीसगडने 7 गड्यांच्या मोबदल्यात 578 धावा करून पहिला डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात पुजाराच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर सौराष्ट्राने खेळाच्या चौथ्या दिवशी 8 गडी गमावून 478 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात पुजाराला शेल्डन जॅक्सन 62 धावा आणि अर्पित वासवदा 73 धावा यांची साथ लाभली.