बुद्धिबळ विश्वचषक : दिव्याला पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था/; पणजी
बुद्धिबळ विश्वचषकाच्या आज शनिवारी येथे झालेल्या पहिल्या फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताच्या दिव्या देशमुखला ग्रीक ग्रँडमास्टर स्टॅमॅटिस कोर्कौलोस-आर्डिटिसकडून पराभूत व्हावे लागले, तर दोन सर्वोत्तम आशा असलेले खेळाडू ग्रँडमास्टर रौनक साधवानी आणि एस. एल. नारायणन यांना दक्षिण आफ्रिकेचा डॅनियल बॅरिश आणि पेरूचा स्टीव्हन सलास रोजास यांनी बरोबरीत रोखले.
अन्य लढतीत व्ही. प्रणवने बॉलरेन्स अला एडिन बौलरेन्सचा (अल्जेरिया), तर एम. प्रणेशने सातबेक अखमेदिनोव्हचा आणि पा इनियानने डायलन इजिद्रो बेरदायेस अॅसोनचा पराभव केला. लिओन ल्यूक मेंडोन्साने वांग शिक्सू (चीन) याच्याशी बरोबरी साधली. पहिल्या फेरीसाठी निवडलेल्या 156 खेळाडूंच्या बहुतेक सामन्यांची वाटचाल रँकिंगला अनुरूप राहिलेली असली, तरी विश्वचषकाच्या बाद फेरीस शोभेल असे काही धक्के देखील पाहायला मिळाले.
चार खेळाडू खेळण्यासाठी आले नाहीत आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना पुढे चाल मिळाली. तथापि, ज्यांना विनासायास गुण मिळाला ते सर्व उच्च दर्जाचे खेळाडू आहेत आणि यामुळे त्यांना या 20 लाख अमेरिकन डॉलर्सच्या बक्षीस रकमेच्या स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश मिळेल. या स्पर्धेतून पुढील कँडिडेट स्पर्धेसाठीची तीन स्थाने निश्चित होणार आहेत.
जागतिक विजेता डी. गुकेश, अर्जुन एरिगेसी, आर. प्रज्ञानंद, पी. हरिकृष्ण, विदित गुजराती आणि निहाल सरिन यासह प्रमुख भारतीय खेळाडूंना दुसऱ्या फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे, ज्यामध्ये 128 खेळाडूंचा समावेश असेल. प्रत्येक फेरी दोन क्लासिकल गेमसह बाद पद्धतीने खेळविली जाईल आणि जर सामना बरोबरीत राहिला, तर कमी कालावधीचे गेम्स विजेता ठरवतील.