चेस क्वीन...
महाराष्ट्रकन्या दिव्या देशमुख हिने महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावत केलेली कामगिरी ऐतिहासिकच म्हटली पाहिजे. जॉर्जिया येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंवर मात करतानाच अंतिम स्पर्धेत देशभगिनी कोनेरू हंपीसारख्या कसलेल्या बुद्धिबळपटूवर विजय मिळवत दिव्याने खऱ्या अर्थाने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. वास्तविक बुद्धिबळ नावातच या खेळाचे मर्म दडले आहे. या खेळामध्ये बुद्धीबरोबर संयम, जिद्द, एकाग्रतेची कसोटी लागते. आक्रमण, बचाव याचा योग्य ताळमेळ साधतानाच तोल ढळू न देता चाली रचाव्या लागतात. एक छोटीशी चूकही खेळ बिघडवू शकते. अशा सर्वार्थाने आव्हानात्मक असलेल्या खेळात महाराष्ट्राची एक कन्या वयाच्या 19 व्या वर्षी जग जिंकण्याची किमया करते, ही समस्त महाराष्ट्रवासियांबरोबर देशासाठीही अभिमानास्पद बाब ठरावी. दिव्याचा जन्म 2005 चा उपराजधानी नागपूरमधला. आई-वडिल दोघेही व्यवसायाने डॉक्टर. पण आईवडिलांनी तिच्यावर कोणताही दबाव व दडपण न आणता तिच्या आवडीनिवडी जोपासण्यास प्रोत्साहन दिले. तिच्या आईने तर दिव्याच्या खेळाकरिता आपले काम सोडले व तिच्याकरिता पूर्ण वेळ दिला. त्यामुळे दिव्याच्या या यशाचे श्रेय तिच्या आईलाही द्यावे लागेल. तशी लहानपणापासूनच दिव्याला बुद्धिबळाचा पट खुणावत होता. अगदी खेळण्याबागडण्याच्या वयात दिव्याची या खेळाशी गट्टी जमली आणि हा छंदच तिच्या करिअरचा रस्ता बनला. शालेय वयातच तिने खेळायला सुऊवात केली आणि वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले. त्यातूनच तिने सर्वप्रथम आपली चुणूक दाखवून दिली. त्यानंतर 10 वर्षांखालील आणि 12 वर्षांखालील जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील अजिंक्यपद हा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंटच म्हणायला हवा. अनुक्रमे दरबन व ब्राझीलमध्ये झालेल्या या स्पर्धांमधून तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव आला. त्यानंतर महिला राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा, आशियाई महिला चँपियनशीप, ज्युनिअर गर्ल्स चँपियनशीप अशा अनेक स्पर्धांमध्ये तिने बाजी मारली. आता वमन फिडे मास्टरबरोबर ग्रँडमास्टर व इंटरनॅशनल मास्टर होण्याचा बहुमानही मिळवणे, यातूनच तिचे कौशल्यच अधोरेखित होते. कोणत्याही खेळामध्ये सातत्य अतिशय महत्त्वाचे असते. बुद्धिबळासारख्या माईंडगेममध्ये तर सातत्य ठेवणे, ही कठीण परीक्षाच होय. परंतु, त्यातही उत्तीर्ण होऊन दिव्याने आपली चमक दाखवून दिली आहे. कोनेरू हंपी, द्रोणावली हरिका, रमेशबाबू वैशाली यांच्यासह ग्रँडमास्टर यादीत स्थान मिळवणारी ती चौथी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे, तर एकूण 88 वी भारतीय बुद्धिबळपटू आहे. ही मोठी मजल ठरते. या स्पर्धेतील दिव्याच्या कामगिरीवर नजर टाकली, तर त्यातून तिच्या विजयाचे मोल लक्षात येते. उपांत्यपूर्व फेरीत ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्लीविऊद्ध तिचे दोन्ही सामने अनिर्णित राहिले होते. पण, टायब्रेकरमध्ये विजय मिळवत तिने पुढचे पाऊल टाकले. त्यानंतर उपांत्य फेरीत तिने केलेला खेळ अफलातून असाच म्हणता येईल. चीनची आंतरराष्ट्रीय मास्टर तान झोंगी हिला तिने ज्या पद्धतीने बाहेरचा रस्ता दाखवला, त्याला तोड नाही. 1.5 वि. 05 हा तिचा स्कोअरच काय ते सांगतो. कोनेरू हंपीचा अनुभव तसा दांडगा. अतिशय विचारपूर्वक चाली रचणारी खेळाडू म्हणून कोनेरू प्रसिद्ध आहे. भक्कम बचाव हे तिचे वैशिष्ट्या. तर आक्रमकता हा दिव्याचा विशेष. दोन दिवस त्यांच्यात क्लासिकल सामने झाले. त्यात दोघींनीही आपला क्लास दाखवून दिला. परंतु, ही लढत अनिर्णितच राहिली. त्यामुळे टायब्रेकरमध्ये काय होणार याची जगभरातील बुद्धिबळप्रेमींना उत्सुकता होती. तथापि, पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या दिव्याने पाचव्या स्थानावरील कोनेरू हंपीला रोखत नवा इतिहास घडवला. जागतिक क्रमवारीत दिव्या 18 व्या स्थानावर आहे. त्यात कोनेरू हंपी दोन वेळा विश्वविजेती राहिलेली. मात्र, याचे कोणतेही दडपण न घेता दिव्याने सुऊवातीपासूनच आक्रमक खेळ केला. मुख्य म्हणजे तिने कोनेरू हंपीला वर्चस्व गाजवण्याची संधीच दिली नाही. त्यामुळेच 2.5 वि. 1.5 अशा फरकाने ती जिंकू शकली. विजयानंतर तिने आईला मारलेली मिठी आणि तिच्या डोळ्यात तरळलेले आनंदाश्रू बरेच काही सांगून जातात. तशी भारतासारख्या देशाला बुद्धिबळाची मोठी परंपरा लाभल्याचा इतिहास आहे. स्पर्धात्मक बुद्धिबळामध्ये पूर्वी रशिया, चीन वा तत्सम देशांचे वर्चस्व असायचे. विश्वविजेत्या विश्वनाथ आनंद याने सर्वप्रथम भारताला बुद्धिबळाच्या नकाशावर आणले. आनंदच्या खेळाने अनेकांना प्रेरणा, स्फूर्ती व आनंद दिला. त्यातून एक नवी पिढी सज्ज झाली. पुऊषांमध्ये डी. गुकेश, प्रज्ञानंद यांसारखे खेळाडू ही परंपरा पुढे नेत आहेत. तर महिला बुद्धिबळाच्या क्षितिजावर नवनवीन तारका चमकू लागल्या आहेत. ही समाधानाची बाब होय. विश्वचषक किंवा जागतिक स्पर्धांना चिनी खेळाडू अतिशय महत्त्व देतात. 1990 पासून महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धावर चिनी खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. परंतु, यंदा भारतीय खेळाडूंनी चिनी वर्चस्वाला धक्का दिला, ही ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांची प्रतिक्रिया बोलकी म्हणायला हवी. चिनी खेळाडू तयारीच्या असतात. त्यांना नमवणे सोपे नसते. परंतु, कोनेरू व दिव्याने दिग्गज बुद्धिबळपटूंचे आव्हान संपुष्टात आणले. उपांत्यपूर्व फेरीत चार महिला बुद्धिबळपटूंचा समावेश असणे, यातच सर्व आले. दिव्याला श्रीनिवास नारायणन यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी दिव्याची मानसिक स्थिती आणि तणावाखाली खेळण्याची क्षमता अनेकदा एमएस धोनीसारखी असल्याचे वर्णन केले आहे. हे वर्णन किती सार्थ आहे, हे दिव्याने दाखवून दिले. खरे तर भारतासारख्या देशात टॅलेंटची कमी नाही. ते हेरून नव्या खेळाडूंना संधी आणि सुविधा दिल्या, तर विजयाचा हा सिलसिला कायम राहील.