चेन्नईचा विजयी समारोप
आयपीएल : अखेरच्या सामन्यात गुजरातचा 83 धावांनी केला पराभव : सामनावीर ब्रेविसची 23 चेंडूत 57 धावांची खेळी :
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने गुजरात टायटन्सचा 83 धावांनी पराभव करत शेवट गोड केला. या पराभवामुळे गुजरात जरी अव्वल क्रमांकावर असले तरी त्यांचे गुणतालिकेतील गणित मात्र बिघडले आहे. अव्वलस्थान टिकवणे हे आता त्यांच्या हातात नसणार आहे. दुसरीकडे, जर आरसीबी, पंजाब किंग्ज किंवा मुंबई इंडियन्सपैकी कोणीही त्यांचा शेवटचा सामना जिंकला, तर गुजरात टायटन्स टॉप 2 च्या शर्यतीतून बाहेर पडू शकते. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 230 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 147 धावांत ऑलआऊट झाला. 23 चेंडूत 57 धावांची खेळी करणाऱ्या चेन्नईच्या ब्रेविसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो आयुष म्हात्रेने पूर्णपणे खरा ठरवला. आयुष सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होता. त्याने अर्शद खानविरुद्ध एका षटकात 28 धावा ठोकल्या आणि खळबळ उडवून दिली. चौथ्या षटकात आऊट होण्यापूर्वी, आयुषने 17 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्या आणि डेव्हॉन कॉनवेसोबत 44 धावांची सलामी भागीदारी केली. धमाकेदार सुरुवातीनंतर, धावगती कायम ठेवण्याचे काम उर्विल पटेलने केले, ज्याने 19 चेंडूत 37 धावा केल्या आणि 10 व्या षटकात 107 धावांवर आऊट झाला. शिवम दुबे (17) स्वस्तात बाद झाला.
ब्रेविस, कॉनवेची अर्धशतके
कॉनवेने सुरुवातीला वेळ घेतला, पण नंतर त्यानेही चालू हंगामातील त्याचे दुसरे अर्धशतक झळकावले. कॉनवेने 35 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. अर्धशतकानंतर मात्र तो लगेच बाद झाला. यानंतर येथून, ब्रेव्हिस आणि रवींद्र जडेजा या जोडीने डाव पुढे नेला. ब्रेव्हिसने फक्त 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि शेवटच्या षटकात बाद होण्यापूर्वी 23 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांसह 57 धावा केल्या. तर जडेजा 18 चेंडूत 21 धावा काढून नाबाद राहिला. या जोरावर चेन्नईने 20 षटकांत 5 गडी गमावत 230 धावा केल्या.
गुजरातचा संघ 147 धावांत ऑलआऊट
231 लक्ष्याचा पाठलाग करताना या हंगामात गुजरातची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्येच कर्णधार शुभमन गिल, जोस बटलर आणि शेरफेन रदरफोर्ड यांच्या विकेट गमावल्या. शुभमन आणि रदरफोर्ड यांना अंशुल कंबोजने आऊट केले. तर बटलरची विकेट खलील अहमदने घेतली. 30 धावांत तीन विकेट गमावल्यानंतर, साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी चौथ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी करून गुजरात टायटन्सला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रवींद्र जडेजाने एकाच षटकात दोघांनाही बाद करून गुजरातला पराभवाच्या छायेत ढकलले. सुदर्शनने 28 चेंडूत 6 चौकारांसह 41 धावा हा सर्वोच्च धावा केल्या. शाहरुख खानने 19 धावांचे योगदान दिले. याशिवाय, अर्शद खानने 20 धावांची खेळी केली. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्याने गुजरातचा संघ 18.3 षटकांत 147 धावांत ऑलआऊट झाला.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्स 20 षटकांत 5 बाद 230 (आयष म्हात्रे 34, कॉनवे 52, उर्विल पटेल 37, शिवम दुबे 17, ब्रेविस 57, जडेजा नाबाद 21, प्रसिद्ध कृष्णा 2 बळी, साई किशोर, रशीद खान व शाहरुख खान प्रत्येकी 1 बळी)
गुजरात टायटन्स 18.3 षटकांत सर्वबाद 147 (साई सुदर्शन 41, शाहरुख खान 19, अर्शद खान 20, अंशुल कंबोज व नूर अहमद प्रत्येकी 3 बळी).
विजय चेन्नईचा, जल्लोष मुंबईच्या समर्थकांचा
आयपीएलमधील आपल्या शेवटच्या सामन्यात चेन्नईने गुजरातचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर गुजरातचे गुण 18 वरच राहतील आणि मुंबईला अव्वल दोन स्थानांमध्ये येण्याची संधी मिळू शकते. येत्या 26 मे रोजी मुंबईचा शेवटचा साखळी सामना पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे. मुंबईला हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. या विजयामुळे मुंबईचे 18 गुण होतील. आणि नेट रन रेटच्या आधारे मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला मागे टाकून टॉप-2 मध्ये स्थान मिळवू शकते आणि पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ होऊ शकते, ज्यामुळे चेन्नईचा विजय झाला तरी जल्लोष मुंबईच्या समर्थकांनी केला.