चेन्नईच्या वेलाम्मल विद्यालयाला विश्व सांघिक बुद्धिबळचे जेतेपद
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सर्वांत तऊण जागतिक विजेता डी. गुकेश आणि ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद यांची शाळा असलेल्या चेन्नईच्या वेलाम्मल विद्यालयाने व्हर्जिनिया, अमेरिका येथे झालेल्या जागतिक शालेय सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. मोगप्पैर परिसरात असलेल्या वेलाम्मल विद्यालयाची चेन्नईतील बुद्धिबळ क्रांतीमागील शक्ती म्हणून कौतुक केले जाते. कारण त्यांच्याकडून शेकडो नवोदित बुद्धिबळ खेळाडूंना तज्ञांद्वारे प्रशिक्षण प्रदान करण्यात येते. आठ रोमांचक फेऱ्यांनंतर 2025 वर्ल्ड स्कूल्स टीम चॅम्पियनशिप अलेक्झांड्रिया, व्हर्जिनिया येथे संपली, असे जागतिक बुद्धिबळ प्रशासकीय संस्था ‘फिडे’ने गुऊवारी जाहीर केले. वेलाम्मल विद्यालयाचा प्रणव के. पी. जो पाचव्या पटावर खेळला तसेच दुसऱ्या पटावरील इमांगली अखिलबे (कझाकस्तान एनएसपीएम) आणि एडिसा बर्डिबाएव्हा (कझाकस्तान एनएसपीएम) यांनी परिपूर्ण गुण (8 पैकी 8) नोंदविले.
एकंदरित वेलाम्मल विद्यालयाने त्यांचे आठ सामने 16 गुणांसह पूर्ण केले. भारतातील वेलाम्मल एमएचएस स्कूलने सुवर्णपदक पटकावताना त्यांचे सर्व आठ सामने जिंकले, असे ‘फिडे’ने म्हटले आहे. वेलाम्मल स्कूलच्या विजयाने भारताच्या बुद्धिबळातील जेतेपदांच्या वाढत्या संग्रहात आणखी एक अध्याय जोडला आहे. ’भारत बुद्धिबळाच्या सर्व स्तरांवर आणि सर्व स्वरूपांत झेप घेत असताना या विजयाने देशाच्या वाढत्या संग्रहात आणखी एक जेतेपद जोडले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
शाळेकडे आनंदसारखा विजेता देखील आहे, असे शाळेचे बुद्धिबळ सहसमन्वयक एस वेलावन यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सांगितले होते. या शाळेत येणाऱ्या बहुतेक मुलांना बुद्धिबळाची खरी आवड असल्याने आम्हाला त्यांच्यावर दबाव आणण्याची गरज पडत नाही. ते अभ्यास आणि बुद्धिबळ यांची चांगली सांगड घालतात आणि खरे तर बुद्धिबळ खेळण्राया विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासात आणखी चांगली कामगिरी केलेली आहे, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या पाच वर्षांपासून सलग फिडे वर्ल्ड स्कूल टीम्स चॅम्पियनशिप जिंकणारे वेलाम्मल विद्यालय 2013 मध्ये तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी सुरू केलेल्या ’7 ते 17 कार्यक्रमा’चे पालन करते.