चेन्नईची पराभवाची हॅट्ट्रिक
दिल्ली सलग तिसऱ्या विजयासह टॉपला : सामनावीर केएल राहुलची 77 धावांची खेळी
वृत्तसंस्था/ चेन्नई
चेपॉक स्टेडियमवर शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जचा 25 धावांनी पराभव केला. यासह दिल्लीने या हंगामात विजयाची हॅट्ट्रिक साधली आणि पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवले. तर चेन्नईला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना देखील खास होता कारण पहिल्यांदाच धोनीचे पालक त्याला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते, पण धोनी संघाला विजय मिळून देऊ शकला नाही. यासह, दिल्लीने 15 वर्षांनंतर चेपॉकमध्ये प्रथमच चेन्नईचा पराभव केला.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 183 धावा केल्या. दिल्लीसाठी, त्यांचा नवा स्टार खेळाडू केएल राहुलला यावेळी सलामीला उतरावे लागले, कारण सलामीवीर फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे सामना खेळू शकला नाही. राहुलने या संधीचा फायदा घेत कठीण परिस्थितीतही उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. राहुलने 51 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 77 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्याशिवाय अभिषेक पोरेलने झटपट 20 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 33 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्स (नाबाद 24), कर्णधार अक्षर पटेल (21) आणि समीर रिझवी (20) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. यामुळे दिल्लीला 183 धावांचा टप्पा गाठता आला. चेन्नईकडून वेगवान गोलंदाज खलील अहमदने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, नूर अहमद, मथीशा पथिराना यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
चेपॉकवर चेन्नईचे लोटांगण
दिल्लीच्या 184 धावांचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरला खरा, पण त्यांना सुरुवातीपासूनच एकामागून एक धक्के बसले. त्यामुळे त्यांची 2 बाद 20 अशी अवस्था झाली होती. सलामीवीर रचिन रविंद्र 3 धावा काढून तंबूत परतला तर कर्णधार ऋतुराज गायकवाडला केवळ 5 धावा करता आल्या. याशिवाय, डेव्हॉन कॉनवेनेही निराशा केली, तो 13 धावा करुन माघारी परतला. इम्पॅक्ट प्लेयर‘ म्हणून आलेल्या शिवम दुबेही काही खास करू शकला नाही, फिरकीपटू विप्राजने 18 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर त्याला बाद केले. रवींद्र जडेजाकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती. पण त्याला कुलदीप यादवने 2 धावांवर आऊट केले. जडेजा बाद झाला तेव्हा चेन्नईची धावसंख्या 5 बाद 74 धावा होती. यानंतर विजय शंकर व धोनीने शेवटपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले पण चेन्नईला 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विजयने 54 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी साकारली तर धोनी 30 धावांवर नाबाद राहिला. हे दोघेही मैदानावर मोठे फटके खेळण्यासाठी झगडताना दिसले. चेन्नईला 20 षटकांत 5 बाद 158 धावापर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून विपराजने 2 तर स्टार्क, मुकेश कुमारने प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 6 बाद 183 (केएल राहुल 77, अभिषेक पोरेल 33, अक्षर पटेल 21, समीर रिझवी 20, स्टब्ज नाबाद 24, खलील अहमद 2 बळी, रविंद्र जडेजा, नूर अहमद, पथिराणा प्रत्येकी एक बळी).
चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकांत 5 बाद 158 (रचिन रविंद्र 3, कॉनवे 13, ऋतुराज गायकवाड 5, विजय शंकर नाबाद 69, धोनी नाबाद 30, विपराज निगम 2 बळी, स्टार्क, मुकेश कुमार, कुलदीप यादव प्रत्येकी एक बळी).