चेन्नईचा पराभवाचा चौकार
पंजाबचा सीएसकेवर 18 धावांनी विजय : सामनावीर युवा प्रियांश आर्याचे शतक :
वृत्तसंस्था / न्यू चंदीगड
प्रियांश आर्यच्या आयपीएलमधील सर्वात जलद शतकाच्या जोरावर पंजाब किंग्सने चेन्नईला पराभवाचा धक्का दिला. प्रियांशच्या शतकाच्या जोरावर पंजाबने 219 धावांचा डोंगर उभारला. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला 5 गडी गमावत 201 धावापर्यंत मजल मारता आली. या विजयासह पंजाबचे सहा गुण झाले आहेत, तर चेन्नईचा संघ दोन गुणांवरच कायम आहे. महेंद्रसिंग धोनीने जोरदार फटकेबाजी करत चांगली लढत दिली, पण त्याला संघाला सामना जिंकवता आला नाही. पंजाब किंग्सने यावेळी चेन्नई सुपर किंग्सवर 18 धावांनी विजय साकारला. विशेष म्हणजे, चेन्नईचा हा पाच सामन्यातील चौथा पराभव ठरला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची या सामन्यात खराब सुरुवात झाली. प्रभसिमरन सिंग खाते न उघडताच बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यर (9), मार्कस स्टोइनिसने (4), नेहल वधेरा (9) आणि ग्लेन मॅक्सवेल (1) हे स्टार फलंदाज झटपट बाद झाले. पण एका बाजूला प्रियांश आर्य खंबीरपणे उभा होता तर दुसऱ्या बाजूला पंजाबचे फलंदाज बाद होत होते. त्यानंतर डावखुरा फलंदाज प्रियांशला शशांक सिंगची साथ मिळाली. दोघांमध्ये 34 चेंडूत 71 धावांची भागीदारी झाली आणि धावसंख्या 150 च्या पुढे गेली.
प्रियांश आर्याची शतकी खेळी
यादरम्यान, प्रियांशने चेन्नईच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई करताना 39 चेंडूत शतक झळकावून आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा संयुक्त चौथा फलंदाज बनला आहे. या बाबतीत, प्रियांशने सनरायझर्स हैदराबादच्या ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडची बरोबरी केली आहे, ज्याने गेल्या हंगामात आरसीबीविरुद्ध इतक्याच चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. प्रियांशचे आयपीएलमधील हे पहिले शतक आहे. तो 42 चेंडूत 7 चौकार व 9 षटकाराच्या जोरावर 103 धावांची खेळी खेळल्यानंतर बाद झाला. नूर अहमदच्या चेंडूवर विजय शंकरने त्याला झेलबाद केले. त्यानंतर शशांक सिंगने 36 चेंडूत नाबाद 52 तर यान्सेनने 19 चेंडूत नाबाद 34 धावांची खेळी साकारली. यामुळे पंजाबने 20 षटकांत 6 बाद 219 धावांचा डोंगर उभा केला.
चेन्नईचा पराभवाचा चौकार
पंजाबने विजयासाठी दिलेल्या 220 धावांचा पाठलाग करताना रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांनी 61 धावांची भागीदारी केली. रविंद्र 36 धावा करुन बाद झाला. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड केवळ एकच धाव करता आली. ज्यामुळे चेन्नई अडचणीत सापडल्याचे दिसून आले. यानंतर, डेव्हॉन कॉनवे आणि शिवम दुबे यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्यात 89 धावांची भागीदारी झाली. कॉनवेने 49 चेंडूत 69 धावांचे योगदान दिले तर दुबेने 42 धावांची खेळी साकारली. ही जोडी बाद झाल्यानंतर चेन्नईची मदार धोनीवर होती. त्याने 12 चेंडूत 27 धावांची खेळी करून नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईला 201 धावापर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्स 20 षटकांत 6 बाद 219 (प्रियांश आर्या 42 चेंडूत 103, शशांक सिंग 36 चेंडूत नाबाद 52, यान्सेन 19 चेंडूत नाबाद 34, खलील अहमद व आर. अश्विन प्रत्येकी दोन बळी, मुकेश चौधरी व जडेजा प्रत्येकी एक बळी)
चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकांत 5 बा 201 (रचिन रविंद्र 36, कॉनवे 49 चेंडूत 69, ऋतुराज गायकवाड 1, शिवम दुबे 42, एमएस धोनी 27, जडेजा 9, विजय शंकर 2, फर्ग्युसन 2 बळी, यश ठाकूर व मॅक्सवेल प्रत्येकी एक बळी)