चेन्नईच्या मोहिमेचा शुभारंभ आज मुंबईविरुद्ध
वृत्तसंस्था/ चेन्नई
इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) मोहिमेच्या आज रविवारी चेन्नईमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची गाठ मुंबई इंडियन्सशी पडणार आहे. चेन्नईचा संघ अनुकूल परिस्थितीत आपल्या जबरदस्त फिरकी गोलंदाजांच्या ताकदीवर तसेच जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांच्याशिवाय खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सविऊद्धच्या अलीकडच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
पाच वेळच्या विजेत्या सीएसकेने गेल्या वर्षीच्या आयपीएल मेगा लिलावात रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, श्रेयस गोपाल आणि दीपक हुडा यांचा समावेश करून त्यांच्या फिरकी माऱ्याच्या ताकदीत वाढ केली आहे. भारताचा अनुभवी रवींद्र जडेजा देखील यात सहभागी आहे. दुसरीकडे, प्रमुख गोलंदाज बुमराहची अनुपस्थिती मुंबईला तीव्रतेने जाणवू शकते. गेल्या वर्षीच्या आयपीएलमधील शेवटच्या लीग सामन्यात संघाच्या स्लो ओव्हर-रेटमुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे मुंबईला या सामन्यात नियमित कर्णधार पंड्याशिवाय देखील खेळावे लागेल. या महत्त्वाच्या दूरस्थ सामन्यात भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबईचे नेतृत्व करेल.
सीएसकेकडे रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे हे दोन किवी सलामीवीर असून त्यापैकी एकटा कर्णधार ऋतुराज गायकवाडसोबत सलामीला येईल. मधल्या फळीत राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, हुडा आणि विजय शंकर हे खेळाडू असतील, त्यानंतर धोनी आणि जडेजा येतील. सीएसकेने मुंबई इंडियन्सविऊद्ध गेल्या पाच सामन्यांमध्ये चार विजय मिळवलेले आहेत.
संघ-चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शेख रशिद, वंश बेदी, सी. आंद्रे सिद्धार्थ, रचिन रवींद्र, रविचंद्रन अश्विन, विजय शंकर, सॅम करन, अंशुल कंबोज, दीपक हुडा, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, खलील अहमद, नूर अहमद, मुकेश चौधरी, गुरुजापनीत सिंग, नॅथन एलिस, श्रेयस गोपाल, मथीशा पाथिराना.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ, रायन रिकेल्टन, श्रीजीथ कृष्णन, बेव्हन जेकब्स, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, मिशेल सँटनर, राज अंगद बावा, विघ्नेश पुथूर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, दीपक चाहर, अश्वनी कुमार, रीस टोपले, व्ही. एस. पेनमेत्सा, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसप्रीत बुमराह.
सामन्याची वेळ-सायं. 7.30 वा.