महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चेन्नईचा पंजाबला दणका

06:58 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

28 धावांनी मात : सामनावीर रवींद्र जडेजाची अष्टपैलू खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ धर्मशाला

Advertisement

येथील एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जला नमवत मागील पराभवाचा हिशोब चुकता केला. चेन्नई हा सामना 28 धावांनी जिंकत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. चार दिवसापूवी झालेल्या सामन्यात पंजाबने चेन्नईला होमग्राऊंडवर पराभूत केले होते. रविवारच्या या सामन्यात मात्र चेन्नईच्या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी साकारत विजयाला गवसणी घातली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 9 बाद 167 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 139 धावापर्यंत मजल मारता आली. 43 धावा व 3 बळी घेणाऱ्या रविंद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

चेन्नईच्या 168 धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात दोन धक्के दिले. तुषारने प्रथम फॉर्मात असलेल्या जॉनी बेअरस्टोला बाद केले, त्याला सात धावाच करता आल्या. यानंतर तुषारने याच षटकात रिली रॉस्यूला बाद केले, त्याला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर प्रभसिमरन सिंग व शशांक सिंग यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले. शशांक सिंगने 4 चौकारासह 27 धावा केल्या, त्याला सँटेनरने बाद करत ही जोडी फोडली. पाठोपाठ प्रभसिमरनलाही जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. प्रभसिमरनने सर्वाधिक 30 धावा केल्या.

जडेजाने त्यानंतर पंजाबचा कर्णधार सॅम करनलाही बाद केले आणि संघासाठी विजयाचे दार उघडले. पंजाबच्या तळाच्या फलंदाजांनीही सपशेल निराशा केली. हर्षल पटेलने 12, राहुल चहरने 16, हरप्रीत ब्रारने नाबाद 17 तर रबाडने नाबाद 11 धावा केल्या. पंजाबला 20 षटकांत 9 बाद 139 धावापर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून जडेजाने सर्वाधिक 20 धावांत 3 गडी बाद केले. तर तुषार देशपांडे व सिमरजित सिंग यांनी प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. दरम्यान, पंजाबचा हा 11 सामन्यातील सातवा पराभव ठरला आहे. प्ले ऑफसाठी त्यांना पुढील सामन्यात मोठ्या फरकासह विजय मिळवावा लागणार आहे.

चेन्नई पुन्हा विजयी ट्रॅकवर

प्रारंभी, पंजाबने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या रुपाने त्यांना पहिला धक्का बसला. रहाणे 9 धावा करुन बाद झाला. ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिचेल यांची चांगलीच जोडी जमली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचली. ऋतुराज पुन्हा मोठी खेळी साकारणार का, असे वाटत होते. पण राहुल चहरने त्याला बाद केले आणि चेन्नईला मोठा धक्का दिला. ऋतुराजने 21 चेंडूंत 32 धावा केल्या. ऋतुराज बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेला भोपळाही फोडता आला नाही. मिचेलही (30 धावा) पाठोपाठ बाद झाल्याने चेन्नईची 4 बाद 75 अशी स्थिती झाली होती.

चेन्नईचा संघ अडचणीत असताना जडेजाने संघाला सावरले. जडेजाने दमदार फलंदाजीचा नमुना पेश करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोठी भूमिका बजावली. जडेजाने 26 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 43 धावांची खेळी साकारली. यामुळे चेन्नईला 20 षटकांत 9 बाद 167 धावांपर्यंत मजल मारता आली. जडेजाला मिचेल सँटेनर (11 धावा) व शार्दुल ठाकूर (17 धावा) करत चांगली साथ दिली. महेंद्रसिंग धोनी यावेळी नवव्या स्थानावर फलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. पंजाबकडून राहुल चहर आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीपने 2 आणि सॅम करनने 1 विकेट मिळवली.

 

संक्षिप्त धावफलक

चेन्नई 20 षटकांत 9 बाद 167 (ऋतुराज गायकवाड 32, डॅरिल मिचेल 30, रविंद्र जडेजा 43, शार्दुल ठाकूर 17, राहुल चहर व हर्षल पटेल प्रत्येकी तीन बळी).

पंजाब 20 षटकांत 9 बाद 139 (प्रभसिमरन सिंग 30, शशांक सिंग 27, हरप्रीत ब्रार नाबाद 17, हर्षल पटेल 12, राहुल चहर 16, रबाडा नाबाद 11, जडेजा 3 तर सिमरजित सिंग व तुषार देशपांडे प्रत्येकी दोन बळी) .

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article