चेन्नई आज राजस्थानविरुद्ध विजयपथावर येण्यास सिद्ध
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने केलेल्या दणदणीत पराभवाने पूर्णपणे हादरलेले चेन्नई सुपर किंग्स आज रविवारी येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना करताना जरा कमी दबावाखाली राहण्याची शक्यता आहे. येथील खेळपट्टीवर मंद गतीने चेंडू वळण्याची अपेक्षा आहे.
सीएसकेकडे खरे तर लांबलचक फलंदाजी फळी असून इम्पॅक्ट प्लेयरमुळे धोनी आता 9 व्या क्रमांकावरील ’टेल-एंडर’ बनला आहे. पण आरसीबीविरुद्ध 175 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करण्याची वेळ आली तेव्हा त्याच फळीकडे पुरेशी ताकद नसल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर बारसापारा स्टेडियमवरील चेपॉकच्या धाटणीच्या खेळपट्टीवर राजस्थानविरुद्ध खेळणे सीएसकेला लाभदायक ठरू शकते. कारण राजस्थानकडे फारसा प्रभावी मारा नाही. तसेच रियान पराग हा कर्णधार म्हणून खूप कच्चा दिसत आहे.
दुसरीकडे, सीएसकेचे स्लिंगर मथीशा पाथिराना आणि डावखुरा फिरकीपटू नूर अहमद हे फॉर्ममध्ये असले, तरी भारतीय गोलंदाजांची फळी प्रभाव पाडू शकलेली नाही. खलील अहमद हा अधूनमधून प्रभाव पाडतो, तर रविचंद्रन अश्विन आणि त्याचा दीर्घकाळचा सहकारी रवींद्र जडेजा हे पूर्वीसारखे धोकादायक राहिलेले नाहीत. पण आज अश्विन आणि जडेजा संजू सॅमसन, पराग, शुभम दुबे, नितीश राणा आणि ध्रुव जुरेल यांच्याविऊद्ध त्यांच्या अनुभवाचा चांगला उपयोग करू शकतात. राजस्थानकडे आता जोस बटलरसारखा मोठा फटकेबाज विदेशी खेळाडू नाही आणि तुषार देशपांडे व संदीप शर्मा यांचा समावेश असलेली भारतीय गोलंदाजांची फळी देखील आत्मविश्वास वाढविणारी नाही. बारसापारा खेळपट्टीचा फायदा घेण्याजोगा दर्जेदार फिरकी गोलंदाजही त्यांच्याकडे नाही.
संघ : चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, सॅम करन, शेख रशिद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुरजनप्रीत सिंग, नॅथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्णन घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (अस्थायी कर्णधार), संजू सॅमसन, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, कुणाल राठोड, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, नितीश राणा, युधवीर सिंग, जोफ्रा आर्चर, महेश थीक्षाना, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय सिंग, तुषार देशपांडे, फजलहक फाऊकी, क्वेना मफाका, अशोक शर्मा, संदीप शर्मा.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.