For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नई विजयी ट्रॅकवर, केकेआरचा पहिला पराभव

06:58 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
चेन्नई विजयी ट्रॅकवर  केकेआरचा पहिला पराभव
Advertisement

चेन्नईचा 7 गडी राखून विजय , कर्णधार गायकवाडचे नाबाद अर्धशतक, सामनावीर जडेजा, तुषार देशपांडे यांचे प्रत्येकी 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी खेळविण्यात आलेल्या 22 व्या सामन्यात कोलकात्ता नाईट रायडर्सने यजमान चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 14 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात कोलकाता संघ दुसऱ्या स्थानावर तर चेन्नई चौथ्या स्थानावर आहेत.  कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी 138 धावांचे माफक आव्हान दिले. चेन्नईच्या तुषार देशपांडे आणि ‘सामनावीर’ रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. चेन्नईने 17.4 षटकात 3 बाद 141 धावा जमवित विजय नोंदविला.

Advertisement

रचिन रवींद्र आणि कर्णधार गायकवाड यांनी सलामीच्या गड्यासाठी 20 चेंडूत 27 धावांची भागिदारी केली. अरोराने रचिन रवींद्रला वरूणकरवी झेलबाद केले. त्याने 8 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावा जमविल्या. रवींद्र बाद झाल्यानंतर मिचेलकडून गायकवाडला चांगली साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी केली. सुनील नरेनच्या गोलंदाजीवर मिचेलचा त्रिफळा उडाला. त्याने 19 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 25 धावा जमविल्या. शिवम दुबेने 18 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह जलद 28 धावा झोडपल्या. त्याने गायकवाडसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 38 धावांची भर घातली. दुबे बाद झाला त्यावेळी चेन्नईला विजयासाठी केवळ 3 धावांची जरुरी होती. कर्णधार गायकवाड आणि धोनी यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. धोनी 1 धावावर नाबाद राहिला. गायकवाडने 58 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 67 धावा झळकविल्या. चेन्नईच्या डावात 4 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. कोलकातातर्फे वैभव अरोराने 28 धावात 2 तर सुनील नरेनने 30 धावात 1 गडी बाद केला.

चेन्नईने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 52 धावा जमविताना 1 गडी गमविला. चेन्नईचे अर्धशतक 35 चेंडूत तर शतक 79 चेंडूत फलकावर लागले. गायकवाडने 45 चेंडूत 7 चौकारांसह अर्धशतक झळकवले. या सामन्यात चेन्नईने मुस्तफिजूर रेहमानच्या जागी शिवम दुबेला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरवले.

पहिल्याच चेंडूवर बळी

तत्पूर्वी, या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून कोलकात्ता संघाला प्रथम फलंदाजी दिली. कोलकाता संघाच्या डावाला खराब सुरूवात झाली. डावातील पहिल्याच चेंडूवर चेन्नईच्या तुषार देशपांडेने सलामीच्या फिल सॉल्टला जडेजाकरवी झेलबाद केले. त्यानंतर सुनील नरेन आणि रघुवंशी यांनी सावध फलंदाजी करत दुसऱ्या गड्यासाठी 6 षटकात 56 धावांची भागीदारी केली. जडेजाच्या गोलंदाजीवर रघुवंशी पायचीत झाला. त्याने 18 चेंडूत 1 षटकार 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. सुनील नरेन जडेजाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 20 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 27 धावा जमविल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने शेवटपर्यंत चिवट फलंदाजी केली. पण त्याला धावांचा वेग वाढविता आला नाही. वेंकटेश अय्यर 3 धावावर बाद झाला. रमनदिप सिंगने 12 चेंडूत 1 षटकारासह 13 धावा जमविल्या आणि तो थीक्षानाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. तुषार देशपांडेने रिंकू सिंगचा त्रिफळा उडविला. त्याने 9 धावा केल्या. आंद्रे रसेल देशपांडेच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात मिचेलकरवी झेलबाद झाला. त्याने 2 चौकारासह 10 धावा केल्या. मुस्तफिजुर रेहमानने कर्णधार श्रेयस अय्यरला रवींद्र जडेजाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 32 चेंडूत 3 चौकारांसह 34 धावा जमविल्या. मुस्तफीजुर रेहमानने स्टार्कला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. डावातील शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मुस्तफीजुर रेहमानने श्रेयस अय्यरला तर चौथ्या चेंडूवर स्टार्कला बाद केले. कोलकात्ता संघाला अवांतर 13 धावा मिळाल्या. त्यांच्या डावात 4 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले.

पॉवरप्लेच्या 6 षटकात कोलकाताने 56 धावा जमविताना 1 गडी गमविला. कोलकात्ता संघाचे अर्धशतक 30 चेंडूत तर शतक 92 चेंडूत फलकावर लागले. चेन्नईतर्फे तुषार देशपांडेने 33 धावात 3 तर रवींद्र जडेजाने 18 धावात 3, मुस्तफीजुर रेहमानने 22 धावात 2 आणि थीक्षानाने 28 धावात 1 गडीबाद केला.

संक्षिप्त धावफलक : कोलकात्ता नाईट रायडर्स 20 षटकात 9 बाद 137 (श्रेयस अय्यर 34, रघुवंशी 24, सुनील नरेन 27, रमनदिप सिंग 13, रसेल 10, अवांतर 13, देशपांडे 3-33, जडेजा 3-18, मुस्तफीजुर रेहमान 2-22, थीक्षाना 1-28), चेन्नई सुपर किंग्ज- 17.4 षटकात 3 बाद 141 (ऋतुराज गायकवाड नाबाद 67, रचिन रवींद्र 15, मिचेल 25, शिवम दुबे 28, धोनी नाबाद 1, अवांतर 5, वैभव अरोरा 2-28, सुनील नरेन 1-30).

जडेजाचे असेही अनोखे शतक

केकेआरविरुद्ध सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करत 18 धावांत 3 बळी व दोन झेल घेणाऱ्या रविंद्र जडेजाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. यासह जडेजाने आयपीएलमध्ये 100 झेल पूर्ण केले आहेत. जडेजाच्या आधी अशी कामगिरी विराट कोहली, सुरेश रैना, किरॉन पोलार्ड आणि रोहित शर्मा यांनीच केली आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक

  1. 110 - विराट कोहली
  2. 109 - सुरेश रैना
  3. 103 - किरॉन पोलार्ड
  4. 100 - रोहित शर्मा
  5. 100 - रवींद्र जडेजा
  6.  98 -  शिखर धवन
Advertisement
Tags :

.