सीएसकेला धक्का, ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर, महेंद्रसिंह धोनी सांभाळणार नेतृत्व
वृत्तसंस्था/चेन्नई
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज शुक्रवारी अडचणीत सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा कोलकाना नाईट रायडर्सशी सामना होणार असून आपल्या निष्ठावंत, पण यशापासून वंचित राहिलेल्या समर्थकांसमोर पराभवांची निराशाजनक मालिका मोडून काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. आणखी एक पराभव सीएसकेसाठी अधिक अडचणी निर्माण करू शकतो. दरम्यान, नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला असून त्यामुळे महेंद्रसिंह धोनी पुन्हा नेतृत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी याला पुष्टी दिली.
चेन्नईला पंजाब किंग्सविऊद्धच्या त्यांच्या मागील सामन्यातील फलंदाजांच्या प्रभावी कामगिरीने काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. मुल्लानपूरमध्ये 219 धावांचे कठीण लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करताना त्यांना 18 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. सीएसके आता चेपॉकवर नशीब बदलण्याची आशा बाळगून असेल. चेपॉकने या हंगामात आतापर्यंत त्यांना भूतकाळासारखा फायदा मिळवून दिलेला नाही, ज्यामुळे काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविऊद्ध स्वीकाराव्या लागलेल्या मोठ्या पराभवानंतर प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनाही निराशा व्यक्त करावीशी वाटली होती.
चेपॉकवरील खेळपट्टी लक्षणीयरीत्या बदलली असून सीएसकेसमोर येथील परिस्थितीशी जुळवून घेण्याशिवाय आता पर्याय नाही. त्यांच्या फिरकीपटूंना या ठिकाणी यशस्वी होण्याचे मार्ग शोधावे लागतील. विजयाच्या मार्गावर परत येण्यासाठी सीएसकेला भरपूर सुधारणा कराव्या लागतील आणि गेल्या काही आठवड्यांप्रमाणेच पुन्हा एकदा अनुभवी महेंद्रसिंह धोनीवर लक्ष केंद्रीत होईल. त्याने पंजाबविरुद्ध 12 चेंडूंत तीन षटकार आणि एका चौकारासह 27 धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र आणि शिवम दुबेसारख्या खेळाडूंनीही काही प्रमाणात धावा जमविलेल्या असल्याने या कठीण काळात सीएसकेसाठी ही सकारात्मक गोष्ट ठरेल.
सीएसकेची गोलंदाजी कमी-अधिक प्रमाणात तशीच राहील. खलिल अहमद, मुकेश चौधरी आणि मथीशा पाथिराना हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील, तर आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि नूर अहमद हे त्रिकूट त्यांच्या फिरकी गोलंदाजीची जादू दाखवतील अशी आशा संघ व्यवस्थापन बाळगून असेल. कोलकाता नाईट रायडर्सचा विचार केला, तर तीन दिवसांपूर्वी लखनौ सुपर जायंट्सविऊद्ध झालेल्या पराभवानंतर ते निश्चितच सतर्क होतील आणि खूप उशीर होण्यापूर्वी विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. ईडन गार्डन्सवर एलएसजीच्या फलंदाजांनी त्यांच्या गोलंदाजांना जेरदार आव्हान दिले आणि चेपॉकवर खूप सुधारित कामगिरीची आशा त्यांना असेल. त्यांचा फलंदाजी विभाग क्विंटन डी कॉक, सुनील नरेन, कर्णधार अजिंक्य रहाणे, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यासारख्या खेळाडूंवर अवलंबून आहे. चार पराभव आणि एका विजयानंतर चेन्नई सुपर किंग्स गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे, तर केकेआर पाच सामन्यांतून दोन विजय आणि तीन पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे.
कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मनीष पांडे, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन, वऊण चक्रवर्ती, एनरिक नोर्टजे, वैभव अरोरा, अनुकूल रॉय, लवनिथ सिसोदिया, मोईन अली, रोवमन पॉवेल, मयंक मार्कंडे, रहमानउल्ला गुरबाज आणि चेतन साकारिया.
चेन्नई सुपर किंग्स : एम. एस. धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, सॅम करन, शेख रशिद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुर्जनप्रीत सिंग, नॅथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्णन घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.