गुजरातविरुद्ध आज वर्चस्व गाजविण्याची चेन्नईला आशा
वृत्तसंस्था /अहमदाबाद
दुखापतींमुळे तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळायचे असल्याने प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीचा फटका बसलेला असतानाही चेन्नई सुपर किंग्ज आज शुक्रवारी येथे 12 व्या फेरीच्या आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना करताना त्यांच्यावर वर्चस्व गाजवू पाहेल. 11 सामन्यांतून 12 गुण झालेल्या ऋतुराज गायकवाडच्या संघासाठी गुजरातविऊद्धचा दूरस्थ सामना खूप महत्त्वाचा असेल. कारण त्यांना अद्याप प्ले ऑफमधील स्थानाची अजून खात्री नाही आणि आज पराभव झाल्यास खरोखरच त्यांच्या संधी कमी होऊ शकतात. दीपक चहर आणि मथीशा पाथिराना दुखापतींमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत आणि मुस्तफिझूर रेहमान बांगलादेश संघातून खेळण्यासाठी परतला आहे. त्यामुळे रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे वगळता सीएसकेच्या गोलंदाजीला दुय्यम मारा म्हटले जाऊ शकते. सीएसकेचे तीन फिरकीपटू रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर आणि मोईन अली हे कसे गोलंदाजी करतात त्यावर आज बरेच काही अवलंबून असेल. तरीही, सीएसकेने धरमशाला येथे पंजाब किंग्जविऊद्ध ज्या पद्धतीने 167 धावांचा बचाव केला त्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या आशा वाढल्या असतील. गुजरातने आतापर्यंत सात सामने गमावले आहेत. आज विजय मिळाल्यास सीएसके चांगल्या धावसरासरीच्या आधारे सनरायझर्स हैदराबादच्या पुढे तिसऱ्या स्थानावर जाईल. 12 गुण झालेल्या तीन संघांपैकी फक्त सीएसकेची धावसरासरी चांगली आहे.
तळाला असलेल्या टायटन्सला यापुढे जास्तीत जास्त 14 गुण कमावता येतील. पण शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघासाठी पहिल्या चार संघांमध्ये पोहोचणे फार कठीण आहे. मागील पाच सामन्यांमधून केवळ एक विजय त्यांना मिळालेला आहे आणि खेळाच्या सर्व विभागांमध्ये संघर्ष करत असलेल्या या संघाचा आत्मविश्वास कमी झाला आहे. दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत त्यांच्या गोलंदाजीची ताकद कमी झाली आहे, तर कर्णधारपदाची जबाबदारी पेलणाऱ्या सलामीवीर गिलने गेल्या पाच सामन्यांमध्ये तीन वेळा एकेरी आकड्यातील धावसंख्या नोंदविली आहे आणि त्याची सर्वाधिक धावसंख्या 35 आहे. गुजरातचे साई सुदर्शन, शाहऊख खान आणि डेव्हिड मिलर सातत्य दाखवू शकलेले नाहीत. पॉवरप्लेमध्ये मोहित शर्मा आणि जोश लिटल हे महागडे ठरलेले असून त्यांनी आपली कामगिरी सुधारण्याची गरज आहे. नवा चेंडू हाताळणाऱ्या गोलंदाजांकडून साथ न मिळाल्याने नूर अहमद व रशिद खान ही अफगाफिस्तानची फिरकी जोडीही कमी प्रभावी दिसली आहे. दुसरीकडे, सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीच्या जवळ पोहोचलेला असून त्याने 11 डावांतून 541 धावा जमविल्या आहेत. डॅरिल मिशेललाही काही प्रमाणात सूर गवसला असून शिवम दुबे सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाल्यानंतर पुन्हा फॉर्ममध्ये येईल अशी संघाला आशा असेल.
- गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, रशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला उमरझाई, उमेश यादव, शाहऊख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुतार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर आणि बी. आर. शरथ.
- चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, अरवेली अवनीश, अजिंक्य रहाणे, शेख रशिद, मोईन अली, शिवम दुबे, आर. एस. हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, निशांत सिंधू. दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, सिमरजित सिंग, प्रशांत सोळंकी, शार्दुल ठाकूर, महीश थीक्षाना आणि समीर रिझवी.
- सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ सिनेमा अॅप.