चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेस प्रारंभ
वृत्तसंस्था/ चेन्नई
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणारा भारतीय ग्रँडमास्टर व अग्रमानांकित अर्जुन एरिगेसीची चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील सलामीची लढत आपल्याच देशाच्या विदित गुजराथीशी होत आहे. मंगळवारपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला.
2800 एलो रेटिंगचा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर एरिगेसी भारतात प्रथमच खेळत आहे. आठ खेळाडूंच्या सहभागाच्या या क्लासिकल स्पर्धेत अरविंद चिदंबरम व इराणचा अमिन ताबाताबाई, मॅक्झिम व्हॉशियर लाग्रेव्ह व परहम मगसुदलू आणि अमेरिकन ग्रँडमास्टर लेव्हॉन अरोनियन व अॅलेक्सी सराना यांच्यात पहिल्या फेरीच्या अन्य लढती होतील. सात फेऱ्यांच्या या दुसऱ्या आवृत्तीत महिलांसाठी प्रथमच चॅलेंजर स्पर्धा घेतली जात आहे.
एमजीडी 1 यांनी चेसबेस इंडियाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे स्पोर्ट्स डेव्हलपमेंट ऑफ तामिळनाडू हे प्रायोजक आहेत. ही स्पर्धा 1100 आसनक्षमतेच्या अॅना सेंटेनरी लायब्ररी येथे घेतली जात आहे. या स्पर्धेत दोन भारतीय महिला हरिका द्रोणावली व वैशाली रमेशबाबू याही सहभागी झाल्या आहेत. चॅलेंजर स्पर्धेसाठी एकूण 20 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून विजेतीस 6 लाख रुपये व पुढील वर्षीच्या मास्टर्स स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे.
चॅलेंजर विभागात वैशालीची लढत मेन्डोन्सा लिऑन ल्युकशी तर हरिकाची लढत प्रणव व्ही.शी होत आहे. अन्य दोन लढती रौनक साधवानी व कार्तिकेयन मुरली आणि प्रणेश एम. व अभिमन्यू पुराणिक यांच्यात होत आहेत. चॅलेंजर स्पर्धा यावर्षी प्रथमच सुरू करण्यात आली असून नवोदित बुद्धिबळपटूंना अव्वल दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळत आहे. गेल्या वर्षी डी गुकेशने पहिली स्पर्धा जिंकली होती, पण यावेळी त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप लढतीच्या तयारीसाठी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. चीनच्या डिंग लिरेनविरुद्ध त्याची वर्ल्ड चॅम्पियनशिप लढत होत आहे.