चेन्नई ग्रँडमास्टर्स : निहालची अर्जुनवर मात, कीमरची आघाडी कायम
वृत्तसंस्था/चेन्नई
भारताच्या निहाल सरिनने चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदविताना चौथ्या फेरीत त्याचा सहकारी अर्जुन एरिगेसीला धक्का दिला. दरम्यान, जर्मन ग्रँडमास्टर व्हिन्सेंट कीमरने आपला अपराजित प्रवास कायम ठेवला आहे. त्याने डच स्टार अनीश गिरीला बरोबरीत रोखून गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. रेती ओपनिंगपासून सुरू झालेल्या तणावपूर्ण, चुरशीच्या लढाईनंतर निहालने अर्जुनवर विजय झाला. बुद्धिबळातील दिग्गज विश्वनाथन आनंद यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये होते. त्यांनी चाहत्यांना एक अनोखा लाईव्ह अनुभव दिला. अर्जुनने 15 व्या चालीवर प्रतिस्पर्ध्याची पहिली सोंगाटी गारद केली आणि हा संथ मध्यम वेगाने पुढे सरकत राहिला. चुरशीच्या मधल्या खेळात निहालला त्याच्या अनुकूलतेचा फायदा घेता आला आणि यंदाच्या आवृत्तीतील पहिला विजय त्याने 70 व्या चालीवर नोंदविला. इतर ठिकाणी ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयननेही प्रभावित करताना जॉर्डन व्हॅन फॉरेस्टला पराभूत करून गुणतालिकेत वरच्या स्थानावर बढती मिळविली.
चौथ्या दिवसानंतर स्थिती
मास्टर्स विभाग-व्हिन्सेंट कीमर 3.5 गुण, अर्जुन एरिगेसी 2.5, अनीश गिरी, रे रॉबसन, अवांडर लियांग, विदित गुजराथी, कार्तिकेयन मुरली प्रत्येकी 2 गुण, निहाल सरिन, व्ही. प्रणव प्रत्येकी 1.5 गुण, जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट 1 गुण. चॅलेंजर्स विभाग-अभिमन्यू पुराणिक 3.5 गुण, एम. प्रणेश 3, दिप्तयन घोष, लिओन ल्यूक मेंडोन्सा प्रत्येकी 3 गुण, पी. इनियान 2.5 गुण, अधिबान भास्करन 2 गुण, वैशाली रमेशबाबू, आर्यन चोप्रा प्रत्येकी 1 गुण, हरिका द्रोणवल्ली, हर्षवर्धन जी. बी. प्रत्येकी 0.5 गुण.