For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नई ग्रँडमास्टर्स : निहालची अर्जुनवर मात, कीमरची आघाडी कायम

06:00 AM Aug 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
चेन्नई ग्रँडमास्टर्स   निहालची अर्जुनवर मात  कीमरची आघाडी कायम
Advertisement

वृत्तसंस्था/चेन्नई

Advertisement

भारताच्या निहाल सरिनने चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदविताना चौथ्या फेरीत त्याचा सहकारी अर्जुन एरिगेसीला धक्का दिला. दरम्यान, जर्मन ग्रँडमास्टर व्हिन्सेंट कीमरने आपला अपराजित प्रवास कायम ठेवला आहे. त्याने डच स्टार अनीश गिरीला बरोबरीत रोखून गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. रेती ओपनिंगपासून सुरू झालेल्या तणावपूर्ण, चुरशीच्या लढाईनंतर निहालने अर्जुनवर विजय झाला. बुद्धिबळातील दिग्गज विश्वनाथन आनंद यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये होते. त्यांनी चाहत्यांना एक अनोखा लाईव्ह अनुभव दिला. अर्जुनने 15 व्या चालीवर प्रतिस्पर्ध्याची पहिली सोंगाटी गारद केली आणि हा संथ मध्यम वेगाने पुढे सरकत राहिला. चुरशीच्या मधल्या खेळात निहालला त्याच्या अनुकूलतेचा फायदा घेता आला आणि यंदाच्या आवृत्तीतील पहिला विजय त्याने 70 व्या चालीवर नोंदविला. इतर ठिकाणी ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयननेही प्रभावित करताना जॉर्डन व्हॅन फॉरेस्टला पराभूत करून गुणतालिकेत वरच्या स्थानावर बढती मिळविली.

मास्टर्सच्या इतर निकालांमध्ये ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर प्रणव व्ही. यांनी बरोबरीवर समाधान मानले, तर ग्रँडमास्टर अवंडर लियांग आणि ग्रँडमास्टर रे रॉबसन या दोन अमेरिकी खेळाडूंमधील संघर्षही प्रत्येकी अर्धा गुण मिळवून देत बरोबरीत सुटला. कीमरने गिरीशी बरोबरी साधल्यानंतर तो सध्या आघाडीवरील एकमेव खेळाडू बनला असून निहालच्या अर्जुनवरच्या विजयामुळे जेतेपदाच्या शर्यतीत नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, चॅलेंजर्स विभागात ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकने ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबूला पांढऱ्या सेंगाट्यांसह खेळताना पराभूत करून एकट्याने आघाडी घेतली. तोवर संयुक्तरीत्या आघाडीवर असलेल्या एम. प्रणेशचा ग्रँडमास्टर अधिबन भास्करनविऊद्धचा सामना बरोबरीत सुटल्याने त्याला फायदा मिळाला. ग्रँडमास्टर दिप्तायन घोषने हर्षवर्धन जी. बी. ला हरवले, तर ग्रँडमास्टर लिओन ल्यूक मेंडोन्सा देखील ग्रँडमास्टर हरिका द्रोणवल्लीवर विजय मिळवून शर्यतीत राहिला. दुसरीकडे, ग्रँडमास्टर पी. इनियानने ग्रँडमास्टर आर्यन चोप्रावर मात करत 2.5 गुण मिळविले.

Advertisement

चौथ्या दिवसानंतर स्थिती

मास्टर्स विभाग-व्हिन्सेंट कीमर 3.5 गुण, अर्जुन एरिगेसी 2.5, अनीश गिरी, रे रॉबसन, अवांडर लियांग, विदित गुजराथी, कार्तिकेयन मुरली प्रत्येकी 2 गुण, निहाल सरिन, व्ही. प्रणव प्रत्येकी 1.5 गुण, जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट 1 गुण.  चॅलेंजर्स विभाग-अभिमन्यू पुराणिक 3.5 गुण, एम. प्रणेश 3, दिप्तयन घोष, लिओन ल्यूक मेंडोन्सा प्रत्येकी 3 गुण, पी. इनियान 2.5 गुण, अधिबान भास्करन 2 गुण, वैशाली रमेशबाबू, आर्यन चोप्रा प्रत्येकी 1 गुण, हरिका द्रोणवल्ली, हर्षवर्धन जी. बी. प्रत्येकी 0.5 गुण.

Advertisement
Tags :

.