चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा आजपासून
स्पर्धेच्या ठिकाणी आग लागल्याने एका दिवसाने प्रारंभ लांबणीवर टाकण्याचा प्रसंग
वृत्तसंस्था/ चेन्नई
सुप्रसिद्ध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय नावांचा समावेश असलेली चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा आज गुऊवारपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या ठिकाणी म्हणजे हयात रीजेंसी हॉटेलमध्ये आग लागल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
स्पर्धेची तिसरी आवृत्ती बुधवारी सुरू होणार होती. पण चेन्नई ग्रँड मास्टर्सच्या ठिकाणी, हॉटेल हयात रीजेंसी येथे मंगळवारी रात्री आग लागली. सर्व खेळाडू सुरक्षित आहेत आणि त्यांना जवळच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. स्पर्धा एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली आहे, असे भारतीय ग्रँडमास्टर आणि स्पर्धा संचालक श्रीनाथ नारायणन यांनी त्यांच्या ‘एक्स हँडल’वर लिहिले आहे.
खेळाडूंना अखेर हॉटेलमध्ये परत आणण्यात आले आहे, परंतु सुरक्षा तपासणीच्या नवीन फेरीनंतर ही स्पर्धा एका दिवस उशिरा सुरू होईल. मध्यरात्रीच्या सुमारास चेन्नईतील हॉटेल हयात रीजेंसीमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. नवव्या मजल्यावर लागलेल्या विजेच्या साहित्याला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण हॉटेल धुराने भरले आणि श्वास घेणे कठीण होण्यापूर्वी सर्वांना हॉटेल रिकामे करावे लागले, असे चेसबेस इंडियाने वृत्त दिले आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्यांची वेळ सारखीच राहील, परंतु आता वेळापत्रकातून विश्रांतीचा दिवस काढून टाकण्यात आला आहे. ‘वेळा त्याच असतील आणि स्पर्धा 15 ऑगस्ट रोजीच संपेल. दरम्यान एक विश्रांतीचा दिवस होता आणि तो आता वेळापत्रकाचा भाग नाही’, असे त्यांनी सांगितले. एक कोटी ऊपयांची बक्षीस रक्कम असलेल्या चेन्नई ग्रँड मास्टर्समध्ये भारताचा अव्वल खेळाडू अर्जुन एरिगेसी, अनुभवी विदित गुजराती आणि नेदरलँड्सचा अनीश गिरी असे प्रभावी खेळाडू आहेत. जागतिक क्रमवारीत 5 व्या क्रमांकावर असलेला एरिगेसी अमेरिकी खेळाडू अवंडर लियांगविऊद्ध आपली मोहीम सुरू करेल.
दोन भारतीय ग्रँडमास्टर एरिगेसी आणि गुजराती यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना 14 ऑगस्ट रोजी आठव्या फेरीत होणार आहे. मागील दोन आवृत्त्यांमध्ये सात फेऱ्यांमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत 19 ग्रँडमास्टर्स सहभागी होतील आणि त्यांना महत्त्वाचे फिडे सर्किट गुण मिळतील. 2026 च्या पॅंडिडेट्स स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी हे गुण महत्त्वाचे असतील. याचे एक उदाहरण म्हणजे विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश आहे, ज्याने गेल्या वर्षी येथील त्याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर कँडिडेट्समध्ये प्रवेश केला होता.