चेन्नईत जन्मलेली कॅटलिन ठरली मिस इंडिया युएसए
वॉशिंग्टन : चेन्नईत जन्मलेली कॅटलिन सँड्रा नीलने (19 वर्षे) न्यूजर्सी येथे आयोजित सौंदर्यस्पर्धेत मिस इंडिया युएसए 2024 चा मान मिळविला आहे. कॅटलिन ही कॅलिफोर्निया विद्यापीठात दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. इलिनोय येथील संस्कृती शर्मा हिने ‘मिसेस इंडिया युएसए’ आणि वॉशिंग्टन येथील अर्शिता कठपालिया हिने ‘मिस टीन इंडिया युएसए’चा मान पटकाविला आहे. भारतीय अमेरिकन नागरिक असलेली कॅटलिन सँड्रा नील ही कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेत आहे. मी स्वत:च्या समुदायावर सकारात्मक स्थायी प्रभाव पाडू इच्छिते आणि महिला सशक्तीकरण तसेच साक्षरतेवर लक्ष केंद्रीत करू इच्छित असल्याचे कॅटलिनने म्हटले आहे. स्वत:ची मेहनत आणि परिवाराच्या समर्थनामुळे मी हे यश मिळवू शकले आहे. समाजाला काहीतरी परत करण्याच्या इच्छेमुळेच मी हा मान मिळवू शकले. महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी मिळावी अशी माझी इच्छा असल्याचे कॅटलिनने नमूद केले आहे. मिस इंडिया युएसएची प्रथम अन् द्वितीय उपविजेती ठरण्याचा मान अनुक्रमे इलिनोइसच्या निराली देसिया आणि न्यूजर्सी येथील मानिनी पटेल यांना मिळाला आहे.