चिनाब सेतू
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल : काश्मीरचा नवा आकर्षणबिंदू
जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण करण्यात आलेल्या चिनाब सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. हा सेतू अभियांत्रिकी चमत्कार म्हणून प्रसिद्धीस पावला असून जगातील सर्वात उंच सेतू होण्याचा सन्मान त्याने प्राप्त केला आहे. जम्मू काश्मीर राज्यातील हे पर्यटनाचे एक नवीन केंद्रदेखील बनू शकते. पुलाला जवळून पाहण्यासाठी एक स्वतंत्र दृश्यबिंदू तयार करण्यात आला आहे. यासोबतच पुलावर रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना बरीच जागा सोडण्यात आली आहे. पुलाजवळ एक हेलिपॅडदेखील तयार करण्यात आला आहे. या सेतूचे नागरी आणि सामरिक अशा दोन्ही प्रकारचे महत्व असून भारताच्या देशव्यापी पायाभूत सुविधा कार्यक्रमाचा तो एक महत्वाचा भाग आहे.सेतूचे लोकार्पण झाले असून आता हा पूल जम्मू काश्मीरच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासात मोठी भर घालणार आहे.
चिनाब सेतूचा ‘श्रीगणेशा’
काश्मीर खोऱ्याला उर्वरित भारताशी जोडणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग म्हणून चिनाब सेतूकडे पाहिले जात आहे. या सेतूची संकल्पना 2002 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातच विचाराधीन होती. या प्रकल्पाला त्यावेळी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून ओळखले गेले होते. तथापि, 2004 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात केंद्र सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रकल्पाची गती मंदावली होती. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाला वेग देण्यात आला. आता या सेतूचे निर्माणकार्य पूर्ण करण्यात आले आहे. सेतूच्या निर्माण कार्यासाठी 1 हजार 486 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
6 जूनला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आता या पुलावरून वंदे भारत आणि इतर गाड्यांचा प्रवास सुरू झाला आहे. या सेतूमुळे भारत आता विकासाच्या मार्गावर तीव्र गतीने वाटचाल करणार आहे. या भागात भारतीय रेल्वे आता आणखी एका उंचीवर पोहोचणार आहे. काश्मीरमध्ये चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वेपुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे. अभियांत्रिकीचा चमत्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिनाब रेल्वेपुलाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिह्यातील कौरी गावाजवळ चिनाब नदीवरील हा रेल्वे पूल देशातील प्रसिद्ध अभियांत्रिकी कंपनी अफकॉन्स इंडियाने बांधला आहे.
अमरनाथ यात्रेकरुंचा प्रवास सुकर
चिनाब रेल्वेपुलामुळे अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सोपा होईल. या ऐतिहासिक पुलाच्या उद्घाटनामुळे पवित्र अमरनाथ गुहेत जाणाऱ्या यात्रेकरूंनाही एक भेट मिळणार आहे. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी ट्रेनमुळे यात्रेकरुंना कटरा आणि श्रीनगर दरम्यान जलद, सुरक्षित आणि सुरळीत प्रवास करण्यास मदत होईल. रामबन-बनिहाल परिसरात मुसळधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बऱ्याच वेळा बंद पडतो. अशावेळी प्रवाशांना ट्रेनने प्रवास करणे सोपे होईल. काश्मीर खोऱ्याला जाणारा हा पहिला थेट रेल्वेमार्ग ठरला आहे.
रेल्वे प्रकल्पाची खासियत
जम्मू-काश्मीरला रेल्वेने देशाच्या इतर भागाशी जोडण्याच्या उद्देशाने बांधलेला हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे. चिनाब रेल्वे पूल कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या देखरेखीखाली देशातील प्रसिद्ध अभियांत्रिकी कंपनी अफकॉन्स इंडियाद्वारे बांधण्यात आला आहे. हा महत्त्वाकांक्षी
प्रकल्प एका जटिल आणि आव्हानात्मक अभियांत्रिकीचा परिणाम असल्याने त्याला मूर्त स्वरुप देण्यासाठी भूगर्भशास्त्र, हिमालयीन भूभाग आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला. या संपूर्ण रेल्वे प्रकल्पासाठी एकंदर 43 हजार कोटी रुपये इतका प्रचंड खर्च होणार आहे.
पुलाचे आयुष्य 125 वर्षे
चिनाब रेल्वे पुलाचे आयुष्य सुमारे 125 वर्षे असेल असे मानले जाते. जोरदार वादळे, भूकंप आणि स्फोटकांचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. जगातील या सर्वात उंच रेल्वे पुलावर ताशी 100 किमी वेगाने गाड्या धावू शकतील. बांधकामादरम्यान चिनाब नदीच्या दोन्ही बाजूंना 3,000 फूट उंचीपर्यंत काम करणाऱ्या उच्च-क्षमतेच्या केबल क्रेन तैनात करण्यात आल्या होत्या. हा पूल 10 अंश सेल्सिअस ते 40 अंश सेल्सिअस तापमानात कोणत्याही समस्येशिवाय सामान्य रेल्वे ऑपरेशन करण्यास सक्षम आहे.
राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा
जम्मू आणि उधमपूर दरम्यान रेल्वेमार्ग टाकण्याच्या प्रकल्पाला 1983 मध्ये मंजुरी देण्यात आली. नंतर 1995 मध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्ग
प्रकल्प त्यात जोडण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 2,500 कोटी रुपये होता. त्यानंतर 2003 मध्ये सरकारने चिनाब नदीवर पूल बांधण्याच्या
प्रकल्पाला मंजुरी दिली. चिनाब नदीवरील पूल बांधणे सोपे काम नव्हते. चिनाब नदी पर्वतांमधील खंदकासारख्या मार्गातून वाहत असल्यामुळे त्यावर पूल बांधणे कठीण होते. हे पाहता सरकारने त्याला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला.
जगातील सर्वोत्तम अभियांत्रिकी
अॅफकॉन्सचे उपव्यवस्थापकीय संचालक गिरीधर राजगोपालन यांच्या मते, पहिल्यांदाच भारतीय रेल्वेमध्ये जगातील सर्वोत्तम अभियांत्रिकी वापरली गेली आहे. पहिल्यांदाच चिनाब पुलाच्या व्हायाडक्ट भागाच्या डेक लाँचिंगसाठी ट्रांझिशन कर्व्ह आणि रेखांशिक ग्रेडियंटवर वाढीव लाँचिंग करण्यात आले. साधारणपणे एकसमान त्रिज्येच्या सरळ किंवा वक्र प्लॅटफॉर्मवर पूल हळूहळू बांधले जातात. खराब हवामान आणि वादळी वाऱ्याच्या परिस्थितीत लाँचिंग क्रियाकलाप करणे अत्यंत आव्हानात्मक होते.
नदी-डोंगरांमध्ये कोणताही बदल नाही...
1,315 मीटर लांबीच्या जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामात नदी किंवा तेथील डोंगरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही किंवा त्यात कोणताही खांब उभारण्यात आलेला नाही. नदीच्या दोन्ही बाजूंना आर्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. स्टील आणि काँक्रिटपासून बनविलेल्या पुलाच्या बांधकामात 29 हजार मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. पुलासाठी 17 स्पॅन तयार करण्यात आले असून त्यात सहा लाखांहून अधिक बोल्ट बसविण्यात आले आहेत.
पर्यटनाचे चित्र बदलेल...
एकीकडे हा पूल भारतीय अभियंत्यांच्या कौशल्याचे, तंत्रज्ञानाचे आणि ताकदीचे अतुलनीय उदाहरण आहे. तर दुसरीकडे तो सौंदर्याच्या बाबतीतही अतुलनीय आहे. आर्च तंत्रज्ञानावर बांधलेला हा पूल पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरेल, ज्यामुळे देशातील रेल्वे पर्यटनाचे चित्र बदलेल. पाऊस आणि हिमवृष्टी दरम्यान पुलावर बांधलेल्या सिंगल लाईन रेल्वे ट्रॅकवरून गाड्या जाताना चिनाब पूल संपूर्ण जगात भारताला एक वेगळी ओळख देईल. भारतीय रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या सततच्या मार्गदर्शनाखाली चिनाब नदीवर बांधलेला हा पूल केवळ रेल्वेसाठी एक मोठी कामगिरी नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमान आणि गौरवाचा क्षण आहे.
चिनाब सेतूची प्रमुख वैशिष्ट्यो
- जगातील सर्वात उंच सेतू : हा सेतू चिनाब नदीवर असून तो नदीपात्रापासून पात्रापासून 359 मीटर किंवा 1 हजार 178 फूट उंचीवर आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वे सेतू असून फ्रान्सच्या आयफेल टॉवरपेक्षा 35 फूट उंच आहे.
- अत्यंत दुगर्म स्थान : हा सेतू अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ स्थानी असून त्याचे निर्माणकार्य हे अभियंत्यांसमोर मोठे आव्हान होते. तथापि भारताच्या अभियंत्यांनी ते उत्कृष्टरित्या पेलले आणि देशाच्या सन्मानात भर टाकली आहे.
- कोणत्याही काळात कार्यरत : हा सेतू कोणत्याही हवामानात कार्यरत राहणार आहे. हिवाळ्यात श्रीनगर ते जम्मू हा वाहनांचा मार्ग बंद होतो. जम्मू भाग जणूकाही काश्मीर खोऱ्यापासून तुटतो. ही त्रुटी या सेतूमुळे दूर होणार आहे.
- अनन्यसाधारण सामरिक महत्व : या सेतूमुळे भारतीय सैनिकांची ने-आण अत्यंत वेगाने आणि सुरळीत करणे शक्य होणार आहे. सामरिक संघर्षाच्या प्रसंगी ही बाब अत्यंत निर्णायक सिद्ध होईल. त्याच्यावरुन दारुगोळाही नेता येईल.
- जम्मू-काश्मीरची आर्थिक प्रगती : हा सेतू जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीचा एक महत्वाचा घटक ठरणार आहे. तो कोणत्याही ऋतूत कार्यरत राहणार असल्याने कृषी आणि व्यापारी वस्तूंची आवक-जावक विनाअडथळा होणार आहे.
देशातील अद्वितीय रेल्वे पूल
चिनाब सेतू अद्वितीय असून 467 मीटरचा आर्च स्पॅन आणि 780.3 मीटर डेक लांबीचा, 8,498 टनांपेक्षा जास्त वजनाचा आहे. जगातील सर्वात मोठा क्रॉसबार केबल क्रेन वापरण्यात आला होता. त्यात बसवलेल्या प्रत्येक हुकमध्ये 40 टनपर्यंतचा भार हाताळण्याची क्षमता आहे. दरीच्या दोन्ही टोकांपासून एकाचवेळी 98 डेक सेगमेंट लाँच करण्यात आले असून प्रत्येकाचे वजन सुमारे 85 टन आहे. रेल्वे प्रकल्पात प्रथमच पुलाच्या प्रत्येक घटकाच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज एनएबीएल प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. कोणत्याही महत्वपूर्ण भूकंपीय किंवा दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठी हा पूल डिझाईन करण्यात आला आहे. तसेच स्फोटके किंवा दहशतवादी कारवायांमुळे प्रभावित न होणारा हा कदाचित पहिला पूल आहे. विशेष तंत्रज्ञानामुळे पुलाचा कोणताही भाग किंवा खांब खराब झाला तरी संपूर्ण पूल कोसळणार नाही, याची काळजीही घेण्यात आली आहे.
संकलन - जयनारायण गवस