बेळगाव जिल्हा रुग्णालयात मिळणार केमोथेरपी
दहा जिल्हा रुग्णालयांत ‘डे केअर केमोथेरपी’चे आज उद्घाटन
बेंगळूर : राज्य सरकारने कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारासंबंधी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बेळगावसह 16 जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘डे केअर केमोथेरपी’ सुरू केली जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे शुक्रवारी म्हैसूरमध्ये 16 जिल्हा रुग्णालयांमधील डे केअर केमोथेरपीचे उद्घाटन करतील. यामुळे कर्करोगाचे निदान झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विकाससौध येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आतापासून जिल्हा रुग्णालयांमध्येही कर्करोगावर उपचार घेता येईल. राज्यात दरवर्षी कर्करोगाचे 70 हजार नवे रुग्ण नोंदविले जात आहेत.
गरिबांना कमी खर्चात कर्करोगावर उपचार घेण्यासाठी बेंगळूरमधील किडवाईसारख्या संस्थांमध्ये जावे लागते. उत्तर कर्नाटकासह किनारपट्टी भागातील रुग्णांना इतक्या दूरवरचा प्रवास करणे कठीण आहे. त्यामुळे गरिबांना अनुकूल व्हावे यासाठी आम्ही 16 जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर केमोथेरपी सुविधा उपलब्ध करत आहे, असे त्यांनी सांगितले. केमोथेरपी केंद्रांवर वैयक्तिक सल्लागार, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, डॉक्टर आणि फार्मसी अधिकारी उपस्थित राहतील. रुग्णांची संख्या वाढत आहे. बेंगळूर शहर, हुबळी, कलबुर्गी, बेळगाव आणि म्हैसूरमध्ये 60 टक्के रुग्णांना केमोथेरपीसाठी 100 कि. मी. पर्यंत प्रवास करावा लागतो. दूरवरच्या प्रवासामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यापासून वंचित राहावे लागते. वेळ आणि त्रासासोबत खर्चही वाढतो. मात्र, भविष्यात अशा समस्या कमी होतील, असा विश्वास आरोग्य मंत्री दिनेश यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्पात झाली होती घोषणा
मागील अर्थसंकल्पात आम्ही केमोथेरपीसंबंधी घोषणा करण्यात आली होती. शुक्रवारी 16 जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर केमोथेरपी सुरू करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे शुक्रवारी म्हैसूरमध्ये याचे उद्घाटन करतील. कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांना केमोथेरपी मिळू शकते. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना यासंबंधी सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मेडिकल ऑन्कोलॉजिस्टची नेमणूक करण्यात आली आहे. परिचारिकांना प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
बीपीएल कुटुंबांसाठी मोफत
प्रत्येक रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांसाठी 10 बेड राखीव ठेवण्यात येतील. त्यासाठी दोन परिचारिका असतील. तसेच वैद्यकीय सल्लागार, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, डॉक्टर आणि फार्मसी अधिकारी यांचाही समावेश असेल. बीपीएल कुटुंबांना केमोथेरपी मोफत मिळेल, अशी माहिती मंत्री गुंडूराव यांनी दिली.