For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॅरलमधील केमिकलयुक्त गॅसचा स्फोट

03:32 PM Jan 11, 2025 IST | Radhika Patil
बॅरलमधील केमिकलयुक्त गॅसचा स्फोट
Advertisement

उंब्रज : 

Advertisement

बंदिस्त बॅरलचे झाकण वेल्डिंग मशीनच्या साहाय्याने काढताना केमिकलयुक्त गॅसचा स्फोट होऊन 25 वर्षीय कामगार ठार झाल्याची घटना कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील इम्प्रोवेट हेल्थ केअर कंपनीच्या आवारात घडली. कंपनीच्या लोखंडी गेटचे वेल्डिंग सुरू असताना व्यवस्थापन व कामगारांच्या बेजबाबदारपणामुळे परप्रांतीय कामगार प्राणास मुकला आहे. या घटनेने तासवडे औद्योगिक वसाहत परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनेमागचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

तासवडे येथील औद्योगिक वसाहतीत पत्र्याचा बॅरल फुटून कामगार ठार झाल्याची घटना शुक्रवारी 10 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. इम्प्रोवेट हेल्थ केअर कंपनीच्या आवारात ही घटना घडली असून माहिती मिळताच तळबीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. भिकेशकुमार रंजन (वय 25, रा. रमेशराव, दख्खनटोला, बिहार) असे या घटनेत ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे.

Advertisement

याबाबत तळबीड पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तासवडे एमआयडीसी येथील डीप्स कंपनीजवळ सागर कुलकर्णी यांच्या मालकीची इंप्रोव्हेट हेल्थकेअर नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात गेल्या दोन दिवसापासून लोखंडी गेट बनवण्याचे काम सुरू आहे. या कामाचे कंत्राट सातारा येथील एका ठेकेदारास दिले असून त्याचे दोन कामगार येथे शुक्रवारी दुपारी काम करत होते. नवीन गेट बनवण्यासाठी लोखंडी पाईप कट करून वेल्डिंग सुरू असताना तेथे शेजारील डिप्स कंपनीतून लोखंडी बॅरल आणून त्याचे टोपण काढण्याचे काम या कामगारांना देण्यात आले. मात्र हा लोखंडी बॅरल बंदिस्त होता. बऱ्याच काळापासून तो बंद असल्याने त्यामध्ये गॅस साठला होता. वेल्डिंग मशीनच्या सहाय्याने बॅरलचे टोपण उघडत असताना अचानक बॅरलमध्ये साचलेल्या गॅसचा स्फोट झाला.

या स्फोटाचा मोठा आवाज झाला. स्फोट भीषण असल्याने वेल्डिंग करणाऱ्या कामगाराला जबर मार बसला. बॅरलचे टोपण व वेल्डिंगसाठी वापरले जाणारे सुरक्षा कवच तुटून कामगाराला जबर मार बसला. त्याच्यासोबत असणाऱ्या कामगाराने त्यास तातडीने उपचारासाठी कराडला हलवले. मात्र या जखमी वेल्डिंग कामगाराचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले व पोलीस कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या आवारात धाव घेऊन सदर घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला. कंपनीत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. मात्र अद्याप आवश्यक फुटेज पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे ही घटना नेमकी कशी घडली? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. तसेच वेल्डिंगचे काम सुरू असताना टोपण उघडण्यासाठी त्या ठिकाणी बॅरल कोणी आणला, सदरचा बॅरल बंदिस्त असल्याने त्यात कोणत्या प्रकारचा गॅस तयार झाला असेल? याबाबतची कोणतीही माहिती संबंधित कामगारांना देण्यात आली नसल्याने ही घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून तासवडे एमआयडीसीतील डी 104 मध्ये डिप्स नावाची कंपनी सुरू असून या कंपनीत जनावरांसाठी असणारी औषधे तयार केली जातात. त्यासाठी विविध प्रकारचे रासायनिक केमिकल वापरले जातात. याच डीप्स मधून सदरचा बॅरल शेजारी कंपनीत आणण्यात आला होता व सदरचे झाकण काढण्याचे काम या कामगारांना देण्यात आले होते. सदरचा बॅरल हा नेमका कोणत्या केमिकलचा होता. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच घटनास्थळी औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांनी ही भेट देऊन तपासणी सुरू केले आहे.

Advertisement
Tags :

.