For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा जयजयकार!

06:37 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा जयजयकार
Advertisement

अव्वल क्रमांकाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान  : जिम्नॅस्टिकपटू संयुक्ता काळे सर्वोत्तम महिला क्रीडापटू

Advertisement

क्रीडा प्रतिनिधी,/ पणजी

महाराष्ट्राने 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुरुवारी 15 व्या दिवशी इतिहास घडवला. महाराष्ट्राने 80 सुवर्ण, 69 रौप्य, 79 कांस्य अशी एकूण विक्रमी 228 पदके कमावली. तसेच सर्वाधिक सोनेरी यश मिळवत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अव्वल क्रमांकाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान संपादन करून देशात महाराष्ट्राची शान राखली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडून महाराष्ट्राला सर्वसाधारण चषक प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राच्या वतीने क्रीडामंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर आणि पथक प्रमुख स्मिता शिरोळे यांनी तो स्वीकारला. 1994 नंतर 29 वर्षांनी हे जेतेपद महाराष्ट्राने पटकावले. जिम्नॅस्टिकपटू संयुक्ता काळेने सर्वोत्तम महिला क्रीडापटूचा चषक पटकावला.

Advertisement

यंदा गतविजेते सेनादल (66 सुवर्ण, 27 रौप्य, 33 कांस्य, एकूण 126 पदके) दुसऱ्या आणि हरयाणा (62 सुवर्ण, 55 रौप्य, 75 कांस्य, एकूण 192 पदके) तिसऱ्या स्थानावर राहिले. महाराष्ट्राची जिम्नॅस्टिकपटू संयुक्ता काळे आणि पश्चिम बंगालच्या प्रणोती नायक यांना सर्वाधिक पदके जिंकल्याबद्दल सर्वोत्तम महिला क्रीडापटूचा पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. कर्नाटकचा जलतरणपटू श्रीहरी नटराज सर्वोत्तम पुरुष क्रीडापटू ठरला. अखेरच्या दिवशी योगासनांमध्ये महाराष्ट्राने तीन सुवर्णपदके पटकावली. नेमबाज अभिज्ञा पाटीलने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातलीर्.िं  दरम्यान, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदकविजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांसाठी अनुक्रमे सात लाख रू., पाच लाख रू. आणि तीन लाख रुपये इनाम देण्यात येणार आहे, असे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी नमूद केले.

महाराष्ट्राकडून दिवाळी साजरी!

खेळाडूंच्या मेहनतीमुळे महाराष्ट्राला विक्रमी द्वीशतकी पदकांचा पल्ला गाठता आला. त्यामुळे ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महाराष्ट्रासाठी अभूतपूर्व अशी ठरली. कारण आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही संघाला 200पेक्षा अधिक पदके जिंकता आलेली नाहीत. म्हणूनच 228 पदके जिंकून यंदा महाराष्ट्राने दिवाळी साजरी केली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.

योगासने महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

योगासने क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. महाराष्ट्र संघाने एकंदर 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य अशी 8 पदके जिंकून योगासन क्रीडा प्रकारांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती किनारे भगिनींनी महिलांच्या कलात्मक दुहेरी प्रकारात 120.5 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. तसेच महिला तालबद्ध दुहेरी प्रकारात रौप्य पदक जिंकले. महिला सांघिक कलात्मक गटात महाराष्ट्राने एकूण 121.95 गुण मिळवून सोनेरी यश मिळवले. उत्तराखंडला रौप्य आणि गुजरातला कांस्य पदक मिळाले. पुरुष सांघिक कलात्मक गटात महाराष्ट्राने एकूण 130.94 गुण मिळवून रौप्य पदक प्राप्त केले. या संघात वैभव श्रीरामे, हर्षल चुटे, ओम वरदाई, मनन कासलीवाल, पवन चिखले यांचा समावेश होता. हरयाणाला सुवर्ण आणि राजस्थानला कांस्य पदक मिळाले. पुरुषांच्या तालबद्ध दुहेरी प्रकारात मनन कासलीवाल आणि ओम वरदाई यांनी 125.25 गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले.

कोल्हापूरच्या अभिज्ञा पाटीलला सुवर्णपदक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिज्ञा पाटील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ‘सुवर्णलक्ष्य‘ साधण्यात यशस्वी ठरली. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रुद्रांक्ष पाटीलचे पदक मात्र थोडक्यात हुकले. 25 मीटर पिस्तूलमध्ये कोल्हापूरच्या अभिज्ञाने पात्रता फेरीत 585 गुण मिळवून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत तिने 35 गुण मिळवून बाजी मारली. पंजाबच्या सिमरनप्रीत बी. हिला रौप्यपदक आणि हरयाणाच्या पायलला कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्राचा शाहू माने 627.5 गुण मिळवल्याने पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यात अपयशी ठरला.

Advertisement
Tags :

.