कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘चेजमास्टर’ !

06:00 AM Mar 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मध्ये भारतानं अंतिम फेरी गाठलीय अन् त्यात महत्त्वाचा वाटा उचललाय तो विराट कोहलीनं...कसोटींतील खराब फॉर्ममुळं प्रचंड टीकेचा धनी व्हावं लागलेल्या किंग कोहलीनं ते अपयश बऱ्यापैकी धुवून काढलंय. खेरीज आपला ‘चेजमास्टर’ या किताबाला तो पुरेपूर जागलाय...

Advertisement

‘त्यानं’ एकदिवसीय सामन्यांना बुद्धिबळप्रमाणं खेळण्याचं तंत्र आत्मसात केलंय...‘त्याची’ फलंदाजी पाहिल्यानंतर मनाला धडक देतात त्या एम. एस. धोनी व मायकल बेव्हनच्या आठवणी...‘तो’ प्रत्येक सामन्यापूर्वी जबरदस्त तयारी करतो आणि मग पाहायला मिळतं ते जोरदार सुरुवातीचं, डावपेचांचं नि शेवटी एखाद्या दोषाला स्थान नसलेल्या, लढत संपविणाऱ्या खेळाचं...साऱ्या क्रिकेट विश्वानं ‘तो’ असं करताना असंख्य वेळा पाहिलंय, मग वातावरण व सामन्याची परिस्थिती कशीही असो...ऑस्ट्रेलियानं आयोजित केलेली 2022 सालची ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धा आठवतेय ?...‘त्यानं’ मेलबर्न मैदानावर पाकिस्तानविरुद्ध दर्शन घडविलं ते विश्वास बसण्यास कठीण अशा फलंदाजीचं, तर मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुबईत ‘त्यानं’ केलेल्या खेळीचं वर्णन ‘मास्टरपीस’ असंच करावं लागेल...नाव : विराट ‘चेजमास्टर’ कोहली !

Advertisement

‘मला खेळपट्टी कुठल्या पद्धतीनं फलंदाजी करणं गरजेचं आहे ते सांगते’, भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर उत्साहानं भरलेला, ‘किंग कोहली’ म्हणूनही क्रिकेट जगतात प्रसिद्ध असलेला भारताचा माजी कर्णधार सांगत होता...‘माझ्या दृष्टीनं वातावरणाला समजणं, एकेरी-दुहेरी धावांवर भर देत भागादारी रचणं अतिशय महत्त्वाचं. याचा अर्थ त्या काढण्यासाठी मी उताविळा झालेला असतो असं मात्र मुळीच नव्हे. जेव्हा तुम्ही दोन क्षेत्ररक्षकांमधून चेंडूला अचूक दिशा दाखविण्यात यशस्वी होता तेव्हा तुमचा खेळ योग्य पद्धतीनं चाललाय याची साक्ष मिळते’, त्याचे शब्द...विराटच्या मते, महत्त्वाच्या लढतीत दबावाला पुरून उरणं खूप मोलाचं. जर फलंदाज शिल्लक असतील, तर विरोधकांना नामोहरम करणं फारसं कठीण नव्हे. आवश्यक असलेली धावांची गती वरच्या दिशेनं गेली, तरी तो अजिबात डगमगत नाही...

विराट कोहलीच्या दर्जाबद्दल शंका कधीच नव्हती..पण कसोटी सामन्यांत त्याला सातत्यानं छळलं ते ऑफस्टम्पबाहेरील चेडूंनी. मात्र एकदिवसीय क्रिकेट म्हणजे त्याचा बालेकिल्ला. विशेष म्हणजे फॉर्मात नसलेला कोहली एकदिवसीय सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर झपकन बदलतो. याचं सर्वोत्तम उदाहरण भारतानं आयोजित केलेल्या 2023 सालया विश्वचषकाचं. त्यात त्यानं मनाला हवी त्याप्रमाणं प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध फटकेबाजी केली, विक्रम नोंदविले. परंतु ती स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मात्र त्याला अजिबात लय सापडलेली नव्हती...‘चॅम्पियन्स चषक’ क्रिकेट स्पर्धेला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तो फिरकी गोलंदाजांना कशा पद्धतीनं खेळेल याविषयी संशय होता...

‘रिस्ट-स्पिनर्स’चा ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू विराटला त्रास देतोय हे आता लपून राहिलेलं नाहीये. ‘गुगली’ देखील ओळखणं त्याला जड जातंय. इंग्लंडविरुद्धच्या भारतातील एकदिवसीय मालिकेत आदिल रशिदनं त्याला सतावलं होतं, तर चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या लढतीत रशिद होसेननं त्याचा बळी मिळविला...तरी सुद्धा विराट कोहलीनं वाट शोधून काढलीच. दुबईतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीनं सिद्ध केलं की, ‘चेजमास्टर’ अजूनही जिवंत आहे...संथ खेळपट्टीवर पाक फलंदाज पाषाण युगातील मानवाप्रमाणं जड हालचाली करत खेळले, तर कोहलीनं मात्र अशा प्रकारच्या ‘पीच’वर कुठल्या पद्धतीनं फलंदाजी करायची असते त्याचे छान पाठ शिकविले...

ऑस्ट्रेलियानं संघात तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश केला होता व त्यापैकी दोन लेगस्पिन टाकणारे. भारताच्या मधल्या फळीची कोंडी करण्यासाठी खेळलेला हा डावपेच...कांगारुंनी लक्ष केंद्रीत केलं होतं ते प्रामुख्यानं विराट कोहलीवर. तो फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर लगेच गोलंदाजी देण्यात आली ती त्याच्याविरुद्ध सर्वांत यशस्वी ठरलेला दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अॅडम झॅम्पाला (विराट व झॅम्पा सर्वप्रथम आमनेसामने आले ते 2017 साली. त्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा विचार केल्यास त्यानं दिग्गज भारतीय फलंदाजाला पाच वेळा बाद केलंय...कोहलीनं ऑस्ट्रेलियाच्या या लेगस्पिनरला निप्रभ करण्यासाठी नेहमीच वापर केलाय तो आक्रमक फटक्यांचा. चॅम्पियन्स ट्रॉफीला प्रारंभ होण्यापूर्वी त्यानं एडमविरुद्ध नोंद केली होती ती 107 च्या ‘स्ट्राईक रेट’नं 245 चेंडूंत 264 धावांची)...

परंतु विराट कोहलीनं हुशालीनं अॅडम झॅम्पाविरुद्ध तंत्र वापरलं ते प्रत्येक चेंडू उशिरा खेळण्याचं. त्यानं पेटीत बंद करून ठेवलेला ‘स्वीप’ देखील बाहेर काढला. मग समालोचन करणारे भारताचे माजी महान सलामीवीर सुनील गावस्कर म्हणाले, ‘तो पूर्वीप्रमाणं प्रत्येक चेंडू ‘फ्रंटफूट’वर येऊन खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. प्रत्येक चेंडू ढकलण्याऐवजी तो आता फटके मारण्यापूर्वी चेंडू बॅटवर येण्याची वाट पाहतोय. शिवाय ‘ओपन स्टान्स’चा आधार देखील त्यानं घेतलाय. ‘स्वीप’ फटका हाणताना त्याला आम्ही पूर्वी फारसं पाहिलं नव्हतं. पण या स्पर्धेत त्यानं त्याचा बऱ्यापैकी वापर केलाय’...

पाकिस्तानविरुद्धच्या नाबाद शतकात विराट कोहलीनं फक्त सात चौकार लगावले, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डावात केवळ पाच. दोन्ही डावांत मिळून त्यानं तब्बल 136 धावा जमविल्या त्या एकेरी-दुहेरीच्या साहाय्यानं. त्याच्या तंदुरस्तीचं महत्त्व स्पष्ट करणारं हे उदाहरण...जगभरातील प्रत्येक फिरकी गोलंदाजाला त्रासदायक ठरणारी बाब म्हणजे ‘स्ट्राईक रोटेशन’. भारताविरुद्धच्या पराभवानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या स्टीव्ह स्मिथनं त्याच्या प्रत्येक ‘अँगल’ला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु कोहलीनं या कलेत आपण अव्वल असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं...जेव्हा तो झॅम्पाला फटका हाणण्याच्या नादात बाद झाला तेव्हा शतकापासून अवघ्या 16 धावा दूर होता. परंतु तोवर भारताची स्थिती फारच भक्कम झाली होती. मग विराट म्हणाला, ‘शतकापेक्षा देशाचा विजय जास्त महत्त्वाचा’...

एकदिवसीय लढतींचा विचार केल्यास विराट कोहलीच्या बॅटमधील ‘पेट्रोल’ अजून संपलेलं नाही हे स्पष्टपणे दिसतंय. त्याला 2027 साली होणार असलेली एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा खेळणं शक्य होईल का ?...या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच समर्थपणे देऊ शकेल...सध्याच्या घडीला तरी न्यूझीलंड नि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकांतील संघर्षानंतर स्वीकारावे लागेले टीकेचे ‘बाऊन्सर’, त्याच्या क्षमतेविषयी घेण्यात आलेल्या शंकांचे ‘बीमर’ अन् आता निवृत्ती घेणंच योग्य अशा प्रकारचे हेटाळणीचे सूर यांना बॅटच्या तडाख्यानं कुठल्या कुठं भिरकावून दिल्याचं विलक्षण समाधान कोहलीला दुबईत मिळालेलं असेल...अन् त्याच्या रसिकांना अपेक्षा असेल ती ‘चेजमास्टर’नं रविवारच्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम लढतीतही आपला इंगा दाखविण्याची !

‘चेजमास्टर’ बिरुद सार्थ...

विराटच्या मदतीला संजय बांगर...

2000 पासून ‘वनडे’मध्ये सर्वात जास्त एकेरी धावा...

फलंदाज            एकेरी धावा

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article