झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणी 12 डिसेंबरला आरोपपत्र
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात आसाम पोलीस 12 डिसेंबर रोजी आरोपपत्र दाखल करणार आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे सीआयडीचे विशेष महासंचालक मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी यासंबंधी माहिती देताना तपास पूर्ण होत आल्याचे स्पष्ट केले. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच अधिक तपशील जाहीर केले जातील असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून 300 हून अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे.
झुबीन गर्ग यांचा मृत्यू 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना बुडून झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर आसाममध्ये सुमारे 60 एफआयआर दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेला अनुसरून मालमत्तेशी संबंधित इतर प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. सिंगापूर पोलीस दलही झुबीन यांच्या बुडण्याच्या घटनेची स्वतंत्र चौकशी करत आहे.