झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणी आरोपपत्र सादर
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात आसाम सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शुक्रवारी गुवाहाटी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. आसाममधील रहिवासी झुबीन गर्ग यांचे 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये निधन झाले होते. त्यांची हत्या झाल्याचा आरोप आहे. घटनेनंतर जवळजवळ तीन महिन्यांनी आसाम सीआयडीने कागदपत्रांनी भरलेल्या तीन बॅगा न्यायालयात सादर केल्या आहेत. आता न्यायालय या आरोपपत्राच्या आधारे पुढील सुनावणी सुरू ठेवून आरोप निश्चित करणार आहे. आसाम विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी झुबीन गर्ग यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत आसाम एसआयटी एक ठोस अहवाल तयार करेल असे म्हटले होते.
झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात आसाम सीआयडीकडे सुरुवातीला भारतीय दंड संहितेच्या कलम 61 (गुन्हेगारी कट), 105 (हत्या न करता सदोष मनुष्यवध) आणि 106 (निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे) अंतर्गत एफआयआर क्रमांक 18/2025 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. नंतर या प्रकरणात बीएनएसच्या कलम 103 अंतर्गत हत्येचा आरोप जोडण्यात आला. गेल्या तीन महिन्यात एसआयटी टीमने सिंगापूरला भेट देत व्यापक तपास केला होता. यादरम्यान सुमारे 300 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे.
या प्रकरणात सिंगापूरचे कार्यक्रम आयोजक श्यामकानू महंत, झुबीनचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, सह-गायक अमृतप्रभा महंत, झुबीनचे बँडमेट शेखर ज्योती गोस्वामी, त्याचा चुलत भाऊ संदीपन गर्ग आणि झुबीनचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी परेश वैश्य आणि नंदेश्वर बोरा यांच्यासह सात जण अनेक महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.