पन्नू प्रकरणी अमेरिकेत आरोपपत्र सादर
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेतल्या शीख्स फॉर जस्टीस या संघटनेचा म्होरक्या आणि खलिस्तानवादी गुरुपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्यासंबंधात अमेरिकेत भारताच्या एका माजी ‘रॉ’ सदस्याच्या विरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. विकाश यादव असे या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या वर्षी न्यूयॉर्क येथे पन्नू याची हत्या करण्याची योजना होती. मात्र, अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेने ती हाणून पाडली, असे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी आणखी एक भारतीय निखील गुप्ता याला काही महिन्यांपूर्वी झेकोस्लोव्हाकिया या देशात अटक करण्यात आली असून त्याला नंतर अमेरिकेत नेण्यात आले होते. त्याच्यावर यापूर्वीच आरोपपत्र सादर करण्यात आले आहे, अशी माहिती शुक्रवारी देण्यात आली.
यादव याचा उल्लेख आजवर सीसी 1 अशा सांकेतिक नावाने करण्यात येत होता. आता त्याची ओळख उघड झाली आहे. यादव हा भारताच असून त्याने निखील गुप्ता याला पन्नू याची हत्या करण्याचे काम सोपविले होते, असा अमेरिकेचा आरोप आहे. यादव हा आता रॉ या संस्थेत काम करत नाही. अनेक वर्षांपूर्वीच त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते, असे भारताने स्पष्ट केले आहे. अमेरिकेकडून यादव याचा शोध घेण्यात येत असल्याचीही माहिती आहे. यादव हा हरियाणातील प्राणपुरा येथील असल्याचीही चर्चा आहे.
भारत सरकारशी संबंध नाही
पन्नू हत्या कारस्थान प्रकरणात भारत सरकारचा हात असल्याचा पुरावा नाही, असे स्पष्टीकरण अमेरिकेच्या प्रशासनाने गुरुवारी केले होते. तसेच भारताने या प्रकरणाच्या तपासात योग्य ते सहकार्य केलेले आहे, असा निर्वाळाही अमेरिकेकडून देण्यात आला आहे. कोणत्याही अमेरिकन नागरीकावर सूड उगविण्याचा प्रयत्न अमेरिका करु देणार नाही. आमच्या नागरीकांची सुरक्षा करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. अशा हत्या कारस्थानांना अमेरिकेत स्थान नाही. सर्व संबंधितांनी याची जाणीव ठेवावी, असा इशाराही अमेरिकेची गुप्तहेर संस्था एफबीआयने या प्रकरणाच्या संदर्भात दिला होता. यादव आणि गुप्ता यांच्या विरोधात आरोपपत्र न्यायालयात सादर करतानाही मुख्य सरकारी वकीलांनी या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला. अमेरिकेत विविध देशांमधून येऊन नागरीक स्थायीक झाले आहेत. त्यांच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व आमच्यावर असून कोणत्याही विदेशी सरकारचा अशा कारस्थानांमध्ये हात असेल त्यांनाही सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.