येडियुराप्पांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र
बेंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणात गुरुवारी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. जुन्या प्रकरणासंबंधी विचारपूस करत अल्पवयीन मुलीला खोलीत नेऊन तिच्याशी येडियुराप्पांनी अनुचित वर्तन केल्याचा उल्लेख चार्जशिटमध्ये करण्यात आल्याचे समजते. याविरुद्ध मुलीने आवाज उठवताच तिला पैसे देऊन परत पाठविल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने फेसबूकवर पोस्ट केलेला व्हिडिओ डिलिट करण्याचा तिघांनी प्रयत्न केला. वाय. एम. अरुण, एम. रुद्रेश, जी. मरिस्वामी यांनी सदर महिलेकडून ती पोस्ट डिलिट करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या नावांचा उल्लेख आरोपपत्रामध्ये आहे.
एका महिलेने येडियुराप्पांवर आपल्या मुलीचे शोषण केल्याचा आरोप करत बेंगळूरच्या सदाशिवनगर पोलिसांत तक्रार दिली होती. त्यामुळे येडियुराप्पांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविले होते. या प्रकरणात अनेकवेळा नोटीस बजावून देखील येडियुराप्पा चौकशीला हजर न झाल्याने सीआयडीने विशेष न्यायालयाकडून अटक वॉरंट मिळविले. परंतु, येडियुराप्पांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने येडियुराप्पांना अटक करू नये, तसेच 17 जून रोजी सीआयडीसमोर हजर व्हावे, असा आदेश दिला होता.