दापोलीचा चरस तस्कर ठाणे पोलिसांच्या जाळ्यात
दापोली :
तालुक्यातील एक तऊण चरस तस्करीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या सापळ्यात अडकला आहे. मसुद बदुद्दीन ऐनरकर (29, रा. अपनानगर, खोंडा-दापोली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 1 किलो 106 ग्रॅम चरस व इतर वस्तूंसह एकूण 1 कोटी 10 लाख 80 हजार 420 ऊपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अमली पदार्थ तस्करीविषयी गुप्त माहिती पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे जिह्यातील शिळफाटा परिसरात हावरे सिटीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचण्यात आला. मसुद ऐनरकर रत्नागिरी जिह्यातून ठाण्याकडे तस्करीसाठी चरस घेऊन येत असताना पोलिसांनी झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला चरस सापडला. चरस हा अमली पदार्थ सहसा विदेशातून भारतात तस्करी करून आणला जातो. त्यामुळे या प्रकरणाच्या मागे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मसुदने हा चरस कोणाकडून आणला आणि पुढे कोणाला विक्रीसाठी देणार होता, याचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणी एन.डी.पी.एस. कायदा कलम 8(क), 20(ब)(प)(क) अंतर्गत शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मसुद ऐनरकर याला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील, अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे हे करीत आहेत. आंतरराष्ट्रीय रॅकेटशी आरोपीचे संबंध असल्यास मोठा गुप्त उलगडा होण्याची शक्यता आहे.