अध्याय दोन, सारांश 1
आत्मस्वरूपाचा विसर पडल्याने अर्जुनाला आप्तस्वकीयांचा मोह होतो. त्यामुळे त्याला कर्तव्याचा विसर पडतो. तो क्षत्रिय असल्याने दुष्टांचा नाश करून सज्जनांना संरक्षण देणे हे त्याचे कर्तव्य होते. ते करायचे सोडून अत्याचारी कौरव हे त्याचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्या अपराधाची क्षमा करायला तो तयार झाला होता तसेच त्यांना मारल्याचे पाप आपल्याला लागेल म्हणून भीतही होता.
भगवंतानी हे सर्व बघितले तसेच युद्ध न करण्याची अर्जुन देत असलेली अनेक खोटीनाटी कारणेही त्यांनी ऐकली. अर्जुनाचे बोलणे आणि वागणे त्यांना अजिबात आवडले नाही. ह्यावरून एक लक्षात येते की, जर मनुष्य मोहात पडून कर्तव्य बजावण्यासाठी मागे हटू लागला तर ते भगवंतांना अजिबात आवडत नाही. बऱ्याचवेळा आळसाने किंवा मोहात पडून आपण कर्तव्य बजावण्याचे टाळत असतो. असं ज्या ज्या वेळी आपण करत असतो त्या त्या वेळी आपण भगवंतांना अप्रिय होत असतो आणि त्यामुळे ते आपल्यावर नाराज होत असतात. भगवंतानी अर्जुनाला खूप नावे ठेवली आणि म्हणाले ऐनवेळी जर तू कर्तव्य बजावण्यापासून मागे हटलास तर तुझ्या पूर्वजांना हे आवडणार नाही आणि तुझी सगळीकडे दुष्कीर्ती होईल. म्हणून ही भिकार, दुबळी वृत्ती तू सोडून दे.
अर्जुन म्हणाला, देवा, भीष्म, द्रोणांना मी बाण कसे मारू? माझे भले नक्की कशात आहे हे काही केल्या माझ्या लक्षात येत नाही म्हणून शिष्य म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे. मोहामुळे माझा स्वभाव स्वार्थी झालेला आहे. त्यामुळे मला स्वधर्माचा विसर पडलेला आहे तेव्हा काय केले असता माझे भले होईल ते मला समजावून सांगा. युद्ध जिंकून मला येथील राज्य आणि नंतर इंद्राचे आसन जरी मिळाले तरी ह्या माझ्या नातेवाईकांच्या माझ्या हातून मरण्याने मला जो शोक होईल तो किंचितही कमी होणार नाही. अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवंताना हसू आले. त्याला त्यांनी उपदेश करायचे ठरवले.
येथून पुढे भगवंताच्या उपदेशाला सुरवात होते. सांख्य तत्वज्ञानाच्या माध्यमातून ते अर्जुनाला उपदेश करत आहेत. म्हणून ह्या अध्यायाला सांख्ययोग किंवा ज्ञानयोग असे म्हणतात. अर्जुन आपल्या आणि नातेवाईकांच्या शरीराच्या मोहात पडलेला आहे हे लक्षात घेऊन त्यांनी त्याला त्याच्या मूळ स्वरुपाची आठवण करून दिली. ते म्हणाले, तू स्वत:ला कर्ता समजून ह्या लोकांच्या हत्येचे पाप तुला लागेल असे म्हणत आहेस.
प्रत्यक्षात आपण सर्वांनी धारण केलेली शरीरे ही तात्पुरती असून आज ना उद्या ही नष्ट होणार आहेत. आपले आत्मस्वरूप हे नित्य म्हणजे कायम टिकणारे असून समोर दिसत असलेला देह हा मिथ्या आहे. जी गोष्ट कायम टिकणारी नसते ती मिथ्या असते. आपल्यातल्या आत्मस्वरूपाचा कोणीही कोणत्याही पद्धतीने नाश करू शकत नाही. ह्या देहाचे अस्तित्व संपले की ते दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. तो कोणीही टाळू शकत नाही. त्यामुळे तू त्याचा शोक करू नकोस.
आत्मस्वरूप अमर असून देह नाशवंत आहे हे सांगून झाल्यावर भगवंत स्वधर्माबद्दल म्हणजे कर्तव्यपालनाबद्दल सांगत आहेत. ते म्हणाले, माणसाने कर्तव्यपालन करण्यापासून कधीही मागे हटू नये. कर्तव्य टाळणे म्हणजे पाप करणे होय. कर्तव्यपालन करत असताना हानी, लाभ, सुख, दु:ख ह्याची चिंता करू नये. ह्यापुढे ते योगबुद्धी म्हणजे काय ते सांगत आहेत. लोकमान्य त्यांच्या गीतारहस्य ह्या ग्रंथात म्हणतात गीतेत जिथे जिथे कर्म हा शब्द आलेला आहे तिथे तिथे भगवंताना कर्मयोग अपेक्षित आहे असे म्हंटले तरी चालेल.
क्रमश: