कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अध्याय दहा सारांश

06:01 AM Jul 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ह्या अध्यायाचे नाव उपदेशयोग असे आहे. ह्यामध्ये बाप्पा सात्विक, राजसी आणि तामसी भक्तीबद्दल आणि ती करणाऱ्या भक्तांच्या स्वभावाबद्दल सांगत आहेत. अध्यायाला सुरवात करताना बाप्पा म्हणतात माणसाच्या स्वभावाचे दैवी, असुरी आणि राक्षसी असे प्रकार आहेत. माणसाच्या जीवनात कोणत्या घटना घडणार आहेत हे प्रारब्धानुसार ठरत असल्याने त्याला अनुरूप असा स्वभाव आणि पार्श्वभूमी त्याला ह्या जन्मात लाभते. कोणता स्वभाव मिळावा हे जरी माणसाच्या हातात नसले तरी जर असुरी किंवा राक्षसी प्रकारचा स्वभाव मिळाला असेल  त्याचा स्वीकार करून त्याने त्याचे दैवी स्वभावात रुपांतर करायचा प्रयत्न करावा.

Advertisement

तीन प्रकारच्या स्वभावापैकी दैवी स्वभाव जर मिळाला असेल तर मृत्यूनंतर त्याला मुक्ती मिळते पण जर असुरी किंवा राक्षसी स्वभाव मिळाला असेल तर मात्र तो त्याला बंधनात अडकवतो. दैवी प्रकृतीचा मनुष्य चहाडी न करणे, दया, अक्रोध, अचापल्य, धैर्य, सरलता, तेज, अभय, अहिंसा, क्षमा, अंतर्बाह्य शुद्धता, दुराभिमान नसणे ह्या गुणांनी युक्त असतो. भांडखोर वृत्ती, अति बडबड, अहंकार, दांभिकपणा, अज्ञान, रागीटपणा, ही असुरी स्वभावाची वैशिष्ट्यो आहेत.

Advertisement

निष्ठुरता, उन्मत्तपणा, मोह, अहंकार, गर्व, द्वेष, हिंसा, निर्दयपणा, अतिराग, जादू टोणा करणे, क्रूर कर्म करण्याची आवड असणे, सज्जनांचा अनादर करणे, अंतर्बाह्य अशुद्धता, आळस, वेदबाह्य वचनांवर विश्वास ठेवणे, सतत दुसऱ्यांना नावे ठेवणे, श्रुती, स्मृती पुराणाबद्दल द्वेषभावना, मुनी, वैदिक, ऋषी ह्यांच्याबद्दल सूडभावना, दुष्ट लोकांची संगत करणे, दुसऱ्याची वस्तू हवीशी वाटणे, सतत काही ना काही इच्छा करणे, कायम खोटे बोलणे, दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे, दुसऱ्याच्या कार्यात विघ्ने आणण्याचा प्रयत्न करणे ही राक्षसी स्वभावाच्या माणसाची वैशिष्ट्यो होत. माझी भक्ती करणारे राक्षसी स्वभावाचे रजोगुणी लोक काही प्रमाणात पुण्यकर्म करणारे असल्याने, पृथ्वीवरून स्वर्गात आणि स्वर्गातून पृथ्वीवर असे भ्रमण करत राहतात. तामसी स्वभावाचे तमोगुणी लोक नक्कीच रौरव नरकात जातात आणि तेथे अवर्णनीय अशी दु:खे भोगतात. पुढे केव्हा तरी पुरेशी शिक्षा भोगून झाल्यावर दैवयोगाने पुन्हा मनुष्य योनीत जन्माला आले तर कुबडे, जन्मांध, पांगळे, दिन असे होऊन जन्म काढतात.

माझ्यावर भक्ती नसणारे लोक पापाचरण करतात व अधोगतीला जातात. जे कोणत्याही योनीत जन्माला आलेले असले तरी माझी भक्ती करतात त्यांना पुढे चांगली गती मिळते. जे माझी सकाम भक्ती करतात त्यांना सहजतेने स्वर्गप्राप्तीसुद्धा होऊ शकते. राजा सकाम भक्ती करणाऱ्याला एकवेळ स्वर्गप्राप्ती होऊ शकेल पण माझ्यावर निरपेक्ष भक्ती जडणे महामुश्कील आहे.

मूर्ख लोक मोहजालाच्या बंधनात अडकलेले असल्याने फळाच्या अपेक्षेने कर्म करतात. ते स्वत:ला कर्ते आणि भोत्ते समजतात, मी ज्ञानी आहे, सुखी आहे असेही त्यांना वाटत असते. तेच त्यांचे अध:पतन घडवून आणते.

म्हणून तू दैवी स्वभावाचे गुण अंगी बाणव आणि माझी भक्ती कर. सात्विक, राजस आणि तामस असे भक्तीचे तीन प्रकार असून देवाची भक्ती करणे हे सात्विक असल्याने शुभ असते. राजस भक्त यक्ष, राक्षसांची भक्ती करतात जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. विचित्र अपेक्षा ठेऊन वेदांनी सांगितल्याच्या विरुद्ध भूत, प्रेतांची केलेली भक्ती ही तामसी असते. जे हट्टाने स्वत:चा देह आणि त्यात राहणाऱ्या मला त्रास देतात त्यांचीही भक्ती तामसी असते. ती माणसाला नरकात ढकलते. काम, लोभ क्रोध व दंभ ही चार नरकाची महाद्वारे असून ती माणसाने वर्ज्य करावीत.

श्रीगणेशगीता अध्याय दहा सारांश समाप्त

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article