रालोआच्या परिषदेवेळी मुजफ्फरमध्ये गोंधळ
मुजफ्फरपूर : बिहारमधील मुजफ्फरपूरच्या गायघाट विधानसभा मतदारसंघात गुरुवारी रालोआ कार्यकर्त्यांच्या परिषदेत मोठा गोंधळ उडाला. जेडीयू आणि एलजेपी (रामविलास पासवान गट) समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याचे निदर्शनास आले. जरंग हायस्कूलच्या मैदानावर आयोजित परिषदेवेळी दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. दोन नेत्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी खुर्च्याही फेकल्या. यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचेही दिसून येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी रालोआकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारे विधानसभानिहाय कामगार परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत. ही परिषद गुरुवारी गायघाट ब्लॉकमधील जरंग हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आली होती. याचदरम्यान मारामारीचा प्रकार घडला. जेडीयू नेते प्रभात किरण आणि एलजेपी नेते कोमल सिंग यांच्यात हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. वादाचे रुपांतर शारीरिक हिंसाचारात झाले.