रायगडवर जय जिजाऊ, जय शिवरायचा जयघोष
मराठा महासंघाकडून किल्ले रायगडवर जिजाऊ जयंती उत्साहात
शिवकालीन युद्धकलांच्या प्रात्यक्षिकांचा रंगला थरार
कोल्हापूर
पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला, शिवकालीन युद्धकलांच्या प्रात्यक्षिकांचा थरार, शाहिरीचा आवाज अन् जय जिजाऊ, जय शिवरायच्या जयघोषात दुमदुमलेला रायगड अशा उत्साही वातावरणात शनिवारी दूर्गराज रायगडवर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मोठ्या उत्साहात राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी केली.
मराठा महासंघातर्फे यंदा प्रथमच किल्ले रायगडवर राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी केली. यासाठी शनिवारी कोल्हापुरातून मराठा महासंघाच्या महिला किल्ले रायगडला रवाना झाल्या. बालेकिल्लातील राजदरबारात महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन झाले. शाहीर दिलीप सावंत, मिलिंद सावंत आणि तृप्ती सावंत यांनी ‘अंधार फार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे...., लग्नाला चला...’ अशा गीतांचे सादरीकरण केले. मिशन निर्भय ग्रुपच्या वतीने महिलांना निर्भय बनो असा संदेश दिला. तर शिवाजी पेठ येथील विद्यार्थी कामगार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी युद्धकार्याची प्रात्यक्षिके सादर केली.
वसंतराव मुळीक म्हणाले, राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नुसत्या माता नव्हत्या तर मार्गदर्शिका होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. जिजाऊ माँसाहेबांच्या काळात खऱ्या अर्थाने महिला सुरक्षित होत्या. त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्याचार करणाऱ्यांना चौरंगा करण्याची शिक्षा दिली होती. महिलांवर वाईट नजर टाकणाऱ्यांचे डोळेही काढले जात होते. यामुळे आजही असाच काळ महिला सुरक्षिततेसाठी गरजेचा आहे. यासाठी प्रत्येकाच्या घरात जिजाऊ माँसाहेब जन्माला आल्या पाहिजेत, असे मत मुळीक यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाअध्यक्ष शशिकांत पाटील, शैलजा भोसले, रवी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संयोगीता देसाई, उषा लांडे, नेहा मुळीक-पाटील, भारती पाटील, आयेशा खान, अॅड. विजया पाटील, संजीवनी चौगुले, बबिता जाधव, सारिका पाटील, मालन पाटील, संपत्ती पाटील, वैजंती मुळीक, मंदा साळोखे, कविता मोरे, मंगल कुराडे, संभाजी पाटील, संतोष पाटील, गुरुदास पाटील, मनोज नरके, प्रसाद पाटील, अवधुत पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.