‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’चा जयघोष
अमरनाथ यात्रेसाठी पहिली तुकडी रवाना : आजपासून यात्रेला प्रारंभ : आतापर्यंत 3.5 लाख भाविकांची नोंदणी
वृत्तसंस्था/ श्रीनगर
अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील वातावरण ‘बम-बम भोले’च्या जयघोषाने दुमदुमून गेले आहे. ही यात्रा आज, 3 जुलैपासून अधिकृतपणे सुरू होत आहे. या यात्रेसाठी जम्मूहून पहिली तुकडी बुधवारी रवाना झाली. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी भगवती नगर बेस कॅम्प येथून तुकडी रवाना केली. यादरम्यान भाविक ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’ असा जयघोष करत मार्गस्थ झाले. पंजाबमधील पठाणकोट येथूनही यात्रेकरूंचा एक गट रवाना करण्यात आला. येथून भाविक बालटालमार्गे बाबा बर्फानीच्या गुहेकडे पोहोचतील.
38 दिवसांची ही यात्रा पहलगाम आणि बालटाल दोन्ही मार्गांनी सुरू झाली आहे. ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल. गेल्यावर्षी ही यात्रा 52 दिवस चालली. या काळात 5 लाख भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले. यावर्षी आतापर्यंत 3.5 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. तात्काळ नोंदणीसाठी जम्मूमधील सरस्वती धाम, वैष्णवी धाम, पंचायत भवन आणि महाजन सभा येथे केंद्रे उघडण्यात आली आहेत. या केंद्रांवर दररोज दोन हजार भाविकांची नोंदणी होत आहे. बाबा बर्फानीचे दर्शन घेण्यासाठी अमरनाथ यात्रेला जाणारे भाविक शहरात येऊ लागले आहेत. बुधवारी सकाळी पहिली तुकडी लवकर रवाना झाली. त्यानंतरही टोकन घेऊन भाविक यात्रेसाठी प्रशासनाने उभारलेल्या नोंदणी केंद्रांवर पोहोचू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहर पूर्णपणे शिवमय झाले आहे.
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी हिरवा झेंडा दाखविलेल्या पहिल्या तुकडीत 4000 ते 5000 भाविक सहभागी झाले होते. पहिल्याच दिवसापासून भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले होते. संपूर्ण अमरनाथ यात्रामार्ग गजबजला आहे. हजारो भाविक येथे दाखल होत असल्याने संपूर्ण सतर्कताही बाळगली जात आहे. स्टेशन परिसर बाबा बर्फानीच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. संपूर्ण वातावरण भक्तीमय आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रशासन आणि रेल्वे विभाग पूर्णपणे सज्ज झालेला आहे.
भाविकांच्या गर्दीमुळे जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि आरपीएफचे जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची तपासणी केली जात आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच मेटल डिटेक्टर स्कॅनिंग आणि देखरेख केली जात आहे. रेल्वे स्थानकाच्या आत आणि बाहेर सुरक्षा दलांचे अचूक लक्ष आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवण्यात आले आहेत.