राज्यात विविध ठिकाणी ‘वंदे मातरम्’चा निनाद
पणजी कला अकादमीतील कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
पणजी : भारताचा श्वास असणाऱ्या आणि प्रत्येकाच्या ओठावर अभिमानाने घेतल्या जाणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीताचा काल शुक्रवारी राज्यात निनाद झाला. राज्यातील अनेक ठिकाणी वंदे मातरम् गायनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. राजधानी पणजीतील या कार्यक्रमाला राज्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहत बहारदार असे वंदे मातरम् गीत सादर केले. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांसाठी वंदे मातरम् गीत सादरीकरण कार्यक्रम आयोजित केला होता. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व शाळा, सरकारी कार्यालयांमध्ये सकाळी 9.50 वाजता कार्यक्रम झाला.
कला अकादमी येथे झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, देशाला विकसित भारताचे स्वप्न करायचे असेल तर भारताची ओळख असलेल्या वंदे मातरम् या गीताकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. या राष्ट्रीय गीतामुळे प्रत्येक भारतीयांमध्ये स्वाभीमानाची आणि आत्मतेजाची भावना निर्माण झाली होती. दीडशे वर्ष झालेल्या या वंदे मातरम् गीतामुळे आजही भारत अखंड देश म्हणून जगात वावरत आहे. हे गीत नसून, काळजाचा ठोका आहे. भारत हा सर्वधर्मसमभाव जपणारा देश असून, तो विविधतेने नटलेला आहे, हे वंदे मातरम् या गीतातून स्पष्ट होते. या गीताने अनेक स्वातंत्र्यविरांना ताकद आणि प्रोत्साहन दिले आहे.
युवकांचा विकास हाच देशाचा विकास : मुख्यमंत्री
राज्यात प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. राज्यातील प्रत्येक युवावर्गाला शिक्षित करण्याबरोबरच देशभक्ती टिकून रहावी, यासाठी गोवा सरकार सदोदित प्रयत्न करीत आले आहे. गोवा हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत लहान असले तरी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण गोव्यात मिळत आहे. त्यामुळे युवकांनी विकसित भारत 2047 चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावावा. युवकांचा विकास हाच देशाचा विकास आहे, त्या दृष्टीकोनातून सरकारचे कार्य सुरू असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.