विहिंपतर्फे आज शहरात हनुमान चालिसा पठण
20 हजार रामभक्तांचा सहभाग : आतापर्यंत सुमारे 1 हजार हनुमान चालिसा पठण पूर्ण
बेळगाव : अयोध्या येथे रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवार दि. 22 रोजी होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त शनिवार दि. 20 जानेवारी रोजी बेळगावमध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे हनुमान चालिसा पठण व महाआरती आहे. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो व सरदार्स मैदानावर सायं. 5.30 वा. सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे कृष्णा भट यांनी पत्रकार परिषदेत केले. महिनाभरापासून बेळगावमध्ये लाखो नागरिकांना अक्षता वाटप तसेच राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे. 5 डिसेंबरपासून बेळगावमध्ये दररोज विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात 11 वेळा हनुमान चालिसाचे पठण केले. यामध्ये शेकडो महिला, लहान मुले यांनी सहभाग घेतला होता. आतापर्यंत सुमारे 1 हजार हनुमान चालिसा पठण पूर्ण झाले. बेळगाव जिल्ह्यात साडेचार लाख नागरिकांच्या घरोघरी हनुमान चालिसा व अक्षता पोहोचविल्या आहेत. सोमवारी अक्षता वाहून दिवे लावून हा आनंद साजरा करावा.
आज एकच आवाज हनुमान चालिसाचे पठण
शनिवार दि. 20 रोजी हजारो रामभक्त एकाच आवाजात हनुमान चालिसाचे पठण भक्तीभावाने करणार आहेत. या दोन्ही मैदानांवर 20 हजारांहून अधिक रामभक्तांची उपस्थिती असणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लढ्यावेळी डोक्याला दुखापत होऊन देखील कार सेवेमध्ये भाग घेतलेले अशोक सिंघल यांनी विश्व हिंदू परिषदेच्या बेळगाव येथील समरसता भवन कार्यालयाचे उद्घाटन केले होते. बेळगाव येथील कार्यालयातील सदानंद काकडे, बाबुराव देसाई या ज्येष्ठ प्रचारकांनी सिंघल यांना पाठिंबा देऊन संघर्षाची गती वाढविण्यात मदत केली. यासाठीच विश्व हिंदू परिषदेच्यावतीने घरोघरी हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, आनंद करलिंगण्णावर, मनुस्वामी भंडारी, जेठाभाई पटेल, बिपीन पटेल, संतोष वाधवा, शरद पाटील यासह इतर उपस्थित होते.