चन्नम्मा सर्कल चेंबर धोकादायक
अपघाताची शक्यता : प्रशासनाचे दुर्लक्ष
बेळगाव : शहरातील राणी चन्नम्मा चौकात एक चेंबर धोकादायक स्थितीत असून केव्हा अपघात होईल याची शाश्वती नाही. रात्रीच्यावेळी याठिकाणी दुचाकीचे अपघात होत असल्यामुळे वाहन चालकांना निदर्शनास यावे यासाठी एक पाईपचा तुकडा चेंबरमध्ये लावला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चेंबरची दुरुस्ती मागील अनेक दिवसांपासून रखडली आहे. चन्नम्मा चौक येथील पेट्रोल पंपाच्या शेजारील कॉर्नरवर आठ ते दहा दिवसांपूर्वी चेंबरवरील झाकण मोडले आहे. अवजड वाहने चेंबरवरून घातल्याने झाकण मोडल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानंतरही दुरुस्ती न झाल्याने चेंबरचे नुकसान झाले व त्याठिकाणी खड्डा पडला होता. एखाद्या निष्पापाचा बळी जाण्यापूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत असताना दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. काही स्थानिक नागरिकांनी या चेंबरमध्ये प्लास्टिकचा तुकडा घातला असून यामुळे वेगाने येणाऱ्या वाहनांना नादुरुस्त चेंबरची माहिती होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात जर अशी परिस्थिती असेल तर इतर भागात काय स्थिती असेल, याचा विचार न केलेलाच बरा.