चन्नम्मा चौक रस्ता रुंदीकरणाचा आराखडा तयार
महापालिका अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी सर्कलला भेट देऊन केली पाहणी
बेळगाव : राणी चन्नम्मा चौकातील आयलँड व लोखंडी अँगल हटवून रस्ता रुंदीकरण करण्यासंदर्भात मेजरमेंट तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मनपा आयुक्त कार्तिक एम. यांना केली होती. त्यानुसार शुक्रवारी महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चन्नम्मा सर्कलला भेट देऊन रुंदीकरणासंदर्भात मेजरमेंट तयार केले आहे. चन्नम्मा चौकातून दररोज मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा असते. मात्र त्या ठिकाणी चारही रस्त्यांच्या कोपऱ्यावर शोभेसाठी आयलँड तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर एका ठिकाणी लोखंडी अँगलदेखील आहे. त्यामुळे रस्ता अरुंद बनला असून वाहनांना ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे.
सिग्नल सुटल्यानंतर एकाचवेळी दोन अवजड वाहने सध्या ये-जा करतात. मात्र, भविष्यात चन्नम्मा चौकातून एकाचवेळी तीन अवजड वाहने पार होतील, अशा प्रकारे रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना केली होती. स्वत: जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, मनपा आयुक्त कार्तिक एम., अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी गुरुवारी चन्नम्मा चौकाला भेट देऊन पाहणी केली होती. लागलीच शुक्रवारी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी रस्ता रुंदीकरणासंदर्भात मेजरमेंट तयार केले आहे. सदरचा प्रस्ताव अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांना सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच कार्यवाही केली जाणार आहे.