दक्षिण आफ्रिका संघातही फेरबदल
मार्करमकडे नेतृत्वाची धुरा, टीम इंडियाविरुद्ध टी-20, वनडे व कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपची समाप्ती झाल्यानंतर प्रथमच टीम इंडियाचा विदेश दौरा सुरु होत आहे. दक्षिण आफ्रिका व भारत यांच्यात वनडे, टी-20 व कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी आफ्रिका संघात फेरबदल करण्यात आले असून टी-20 व वनडेची धुरा मार्करमकडे सोपवण्यात आली आहे. कसोटीचे नेतृत्व बवुमाकडे ठेवण्यात आले आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी आफ्रिकेने तिन्ही फॉरमॅटसाठी आपला संघ जाहीर केला आहे. अनुभवी टेंबा बवुमाला वनडे, टी-20 संघातून विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, उभय संघात 10 डिसेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघाने कर्णधार टेम्बा बवुमा आणि कागिसो रबाडा यांना मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती दिली आहे. हे दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेचा भाग असतील. अशात आफ्रिका संघाने टी-20 आणि वनडे मालिकेसाठी मार्करमला कर्णधार बनवले आहे. यापूर्वीही त्याने कर्णधारपद भूषवले आहे. तसेच, गेराल्ड कोएत्झी, मार्को जॅन्सन आणि लुंगी एनगिडी हे देखील पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्येच खेळतील. यानंतर हे पाच खेळाडू कसोटी मालिकेच्या तयारीसाठी 14 ते 17 डिसेंबर दरम्यान देशांतर्गत प्रथमश्रेणी सामन्यात दिसतील. युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला प्रथमच कसोटी संघात संधी देण्यात आली आहे. यष्टीरक्षक फलंदाज काइल व्हेरेन कसोटी संघात पुनरागमन करत आहे. हेन्रिच क्लासेनला कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेला वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्त्जे अजूनही पूर्णपणे बरा झाला नसल्याने निवडीसाठी उपलब्ध नव्हता.
दुसरीकडे, रॅसी व्हॅन डर डुसेनचा केवळ वनडे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला कसोटी आणि टी-20 मधून वगळण्यात आले आहे. डुसेन गेल्या काही काळापासून फारसा फॉर्ममध्ये नाही. अशा स्थितीत आफ्रिकेच्या निवड समितीने नव्या खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे.
बवुमावर वक्रदृष्टी
संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाने शानदार कामगिरी साकारली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या डिकॉक व बवुमा यांनी सुरुवातीला फलंदाजी केली. डिकॉक यामध्ये यशस्वी ठरला तर बवुमाला एकाही सामन्यात अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. यामुळे भारताविरुद्ध मालिकेसाठी आफ्रिकन निवड समितीने बवुमाला वनडे व टी-20 मालिकेतून विश्रांती देत मार्करमवर विश्वास दाखवला आहे. बवुमाकडे फक्त कसोटीचे कर्णधारपद सोपवले आहे. दरम्यान, विश्वचषक संपल्यानंतर दक्षिण आफ्रिका भारताच्या यजमानपदासाठी सज्ज झाली आहे. यादरम्यान प्रथम टी-20 आणि नंतर तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यानंतर उभय संघात दोन कसोटी सामने होतील. वर्ल्डकपनंतर दोन्ही संघ आमनेसामने येत असल्याने या मालिकेकडे क्रिकेटवर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
द.आफ्रिका टी-20 संघ - एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीत्झके, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी (पहिला आणि दुसरा टी-20 सामना), डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जान्सेन (पहिला आणि दुसरा टी-20 सामना), हेन्रिच क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी (पहिला आणि दुसरा टी-20), अँडिले फेहलुक्वायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाद विलियम्स.
द.आफ्रिका वनडे संघ - एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्जी, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिच क्लासेन, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, डेविड मिलर, वियान मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, तबरेज शम्सी, रासी व्हॅन डर ड्युसेन, काइल व्हेरेन आणि लिझाद विलियम्स.
द.आफ्रिका कसोटी संघ - टेम्बा बवुमा (कर्णधार), डेविड बेडिंघम, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्जी, डीन एल्गार, मार्को जान्सेन, केशव महाराज, एडन मार्करम, वियान मुल्डर, लुंगी एन्गिडी, के पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल व्हेरेन.