एप्रिलपासून बँक नियमांमध्ये परिवर्तन
सात महत्वाच्या सुधारणा दिनांक 1 पासून लागू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एप्रिल दिनांक 1 पासून बँक नियमांमध्ये परिवर्तन होणार आहे. बँकांच्या 7 नियमांमध्ये सुधारणा होणार असून या परिवर्तनाचा प्रभाव सर्वसामान्यांवरही पडणार आहे. विशेषत: बँकांच्या खातेदारांना हे नवे नियम समजावून घ्यावे लागणार आहेत. बँकांच्या वर्तणुकीत अधिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, यासाठी ही परिवर्तने करण्यात आली आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
एटीएममधून पैसे काढणे, बचत खाती, व्रेडिट कार्डाचा उपयोग, बँक खात्यांची सुरक्षितता आणि इतर अनेक व्यवहारांच्या नियमात मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. या नियमांना आता मान्यता मिळाली असल्याने ते त्या त्वरित लागू होतील. त्यामुळे बँक व्यवहार करणाऱ्यांनी नियम समजावून घेणे आवश्यक आहे.
एटीएममधून पैसे काढणे
एटीएम व्यवहार शुल्कासंबंधी मार्गदर्शक तत्वे रिझर्व्ह बँकेकडून लागू करण्यात येत आहेत. शुल्यमुक्त मर्यादा आणि शुल्काची अधिकतर मर्यादा यांच्यासंबंधी नवे नियम येत आहेत. विनामूल्य एटीएम विथड्रोवल्सची संख्या कमी करण्यात येईल. ज्या बँकेत खाते नाही अशा अन्य बँक एटीएममधून महिन्याला तीनदा विनाशुल्क पैसे काढता येतील. त्यानंतरच्या व्यवहारांना किमान शुल्क 19 रुपये असेल.
न्यूनतम रक्कम नियम
बँक बचत खात्यात किमान रक्कम असणे अनिवार्य केले जाईल. तसे न केल्यास खातेदाराकडून दंड आकारण्यात येईल. किमान रकमेचा नियम प्रत्येक बँकेचा वेगवेगळा असून शकतो. तसेच खाते कोणत्या प्रकारचे आहे, त्यावरही किमान रकमेचे प्रमाण अवलंबून राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.
पॉझिटिव्ह पे सिस्टिम (पीपीएस)
बँक व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी ही पद्धती रिझर्व्ह बँकेने लागू केली आहे. 50 हजार रुपयांपेक्षा अधिकचे चेक असतील तर त्यांची माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बँकेला द्यावी लागणार आहे. पेमेंटसाठी चेकवर प्रक्रिया करण्यापूर्वी या माहितीची छाननी केली जाईल. या व्यवहारांमध्ये काही गडबड आढळल्यास चौकशी होईल.
डिजिटल बँकिंगमध्ये सुधारणा
पैशाच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल कार्यप्रणातील सुधारणा केल्या जातील. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येईल. या तंत्रज्ञानाच्या आधारावर बँका नवे आधुनिक ऑनलाईन फिचर्स देणार आहेत. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन या दोन सुविधा व्यवहार सुरक्षितेसाठी देण्यात येतील.
युपीआय व्यवहार
युपीआयशी जोडले गेलेले जे मोबाईल क्रमांक प्रदीर्घ कालावधीसाठी उपयोगात आणले गेलेले नाहीत, ते काढून टाकण्यात येतील. आपण मोबाईल क्रमांक युपीआय अॅपशी जोडला असेल आणि तो बराच काळ उपयोगात नसेल तर तो डिलीट केला जाईल. त्यामुळे अशा मोबाईल धारकाला त्यानंतर युपीआयच्या माध्यमातून व्यवहार करता येणार नाहीत, अशी महत्वाची सूचना आहे.
व्रेडिट कार्ड लाभ
प्रमुख बँका 1 एप्रिलपासून व्रेडिट कार्डसंबंधी नियमांमध्ये परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांचा लाभ होण्याची शक्यता आहे. सिंपली क्लिक स्विगी रिवॉर्डस् स्टेट बँकेकडून 5 एक्सच्या पातळीवर आणण्यात येतील. हीच बँक एअर इंडिया सिग्नेचर पॉईंटस्ची संख्या 30 वरुन 10 होणार आहे. आयडीएससीकडून क्लब विस्तारा योजना बंद केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ठेवींवरील व्याजदर वाढणार ?
बचत खाते (सेव्हींग्ज अकाऊंट) आणि मुदत ठेवी यांच्या व्याजदरांमध्ये परिवर्तन केले जाणार आहे. स्टेट बँक, आयटीबीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, तसेच पंजाब अँड सिंध बँक आदी महत्वाच्या बँका मुदतठेवींवरील व्याजदर अधिक आकर्षक करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ठेवींकडे कल वाढावा यासाठी काही उपाययोजना करण्यात येतील, असे दिसून येत आहे.