राज्यात परिवर्तन अटळ
शरद पवार यांना विश्वास : महिलांचे संरक्षण करू न शकणाऱ्या सरकारला सत्तेवऊन खाली खेचा
नागपूर : नागपूर येथील पूर्व-नागपूरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार दृनेश्वर पेठे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली होती. या सभेत शरद पवार बोलत होते, यावेळी काँग्रेस नेते भुपेश बघेल, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शेखर सावरबांधे व पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे उपस्थित होते. यावेळी महायुतीचा आपल्या शैलीत शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला. हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. यासाठी भाजपच्या हातून सत्ता काढून घेण्याचे महत्वाचे काम आपल्याला करायचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत परिवर्तन करायचे आहे, मी खात्री देतो चेहरा विकासाच्या बाबतीत बदल्याशिवाय राहणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.
नागपूरमध्ये विमान निर्माण कारखाना यावा. यासाठी प्रयत्न केले पण तो प्रकल्प गुजरातला गेला, प्रधानमंत्री एका राज्याची हिताची भूमिका घेत आहे, त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे का? असा सवाल करीत नरेंद्र मोदींवर टीका केली. आज शेती सोबत औद्योगिकरण महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीच्या राज्यात कारखाने काढण्यासाठी सुविधा दिल्या पण आता उद्योग परप्रांतात जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना महाराष्ट्र देशात एक नंबरवर होता आता सहाव्या क्रमांकावर गेला आहे अशी टीकाही पवार यांनी केली.
मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणे योग्य नाही : भास्कर जाधव
पूर्व विदर्भात फक्त एक जागा आम्हाला मिळाली, त्या जागेवर काँग्रेसने बंडखोरी केलीय. आजपर्यंत बंडखोर जिल्हाध्यक्षांवर काँग्रेसने कारवाई केली नाही, हे वेदनादायी आहे. रामटेक लोकसभा आम्ही काँग्रेसला दिली, पण त्याचे फळ आमच्या पदरात हे पडणार असेल तर हे वेदनादायक आहे. यामुळे तऊण कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. बंडखोरीचा विषय आमच्या पक्षाने गांभीर्याने घ्यावा. आघाडीत असे वर्तन योग्य नाही. असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला.