शहरात अवजड वाहन प्रवेशबंदीच्या वेळेत बदल
तीन टनांहून अधिक मालवाहतुकीवर बंदी : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना परवानगी
बेळगाव : रोज सकाळी व संध्याकाळी होणारी वाहतूक कोंडी व वाहनांची वर्दळ टाळण्यासाठी पोलीस दलाने अवजड वाहनांना ठरावीक वेळेपुरती बेळगावात प्रवेशबंदी जाहीर केली होती. याआधीच्या वेळेत बदल करण्यात आला असून यासंबंधी पोलीस आयुक्तांनी एक आदेश जारी केला आहे. बेळगाव महानगरपालिका व कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांवर रोज सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत, दुपारी 4 ते रात्री 8 पर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी जारी करण्यात आली होती. या आदेशात बदल करून पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी अवजड वाहनांना प्रवेशबंदीचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या प्रस्तावानुसार यापुढे रोज सकाळी 7 ते 11 पर्यंत, दुपारी 3 ते रात्री 8 पर्यंत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असणार आहे.
तीन टनांहून अधिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना यावेळेत प्रवेशबंदी असणार आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणारी वाहने, शाळेच्या मुलांना ने-आण करणारी वाहने, दूध, पेट्रोल वाहतूक करणारी वाहने, हंगामात ऊस वाहतूक करणारी वाहने, भाजीपाला व फळांची वाहतूक करणाऱ्या तीन टनांपेक्षा कमी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना ही बंदी नसणार आहे. केवळ तीनपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेशबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला वगळून हा आदेश जारी असणार आहे. जुन्या आदेशातील वेळा बदलण्यात आल्या आहेत. यासंबंधी आवश्यक सूचना फलक बेळगावच्या प्रवेशद्वारावर लावण्याची सूचनाही पोलीस आयुक्तांनी केली आहे. पोलीस आयुक्तांच्या या नव्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलीस कार्यरत झाले आहेत.