पोटनिवडणुकीनंतर सरकारमध्ये बदल : एच. डी. कुमारस्वामी
बेंगळूर : चन्नपट्टण विधानसभा पोटनिवडणुकीनंतर राज्यात राजकीय ध्रुवीकरण होईल. तसेच सरकारमध्ये बदल होणार असून अनेक नेत्यांचे भवितव्यही ठरवले जाणार आहे. गेल्यावेळी मी चन्नपट्टणममध्ये केलेली विकासकामे पाहून लोकांनी मला निवडले. यावेळीही ते माझ्या मुलाचा हात धरतील, असा मला विश्वास आहे, असे असे केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले. कुटुंबीयांसह हासन येथील हासनांबेचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विशेष पूजा करून चन्नपट्टणमध्ये मुलाच्या विजयासाठी प्रार्थना केली. माझा मुलगा दोन निवडणुकांमध्ये पराभूत झाला. निखिलने ही निवडणूक जिंकावी यासाठी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे राज्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी. राज्य सरकारच्या अंदाजानुसार यंदा सुमारे 80 हजार हेक्टर प्रदेशातील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी झालेल्या जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये नुकसानीची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने प्रत्येक गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली. राज्यात यंदा मान्सूनचा पाऊस चांगला झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासह राज्यातील बहुतांश जलाशय भरले आहेत. मुसळधार पावसामुळे जोंधळा, द्राक्ष, डाळिंब, तूर, सोयाबीन, कॉफी यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांना पाठवून शेतकऱ्याची व्यथा जाणून घ्यावी, असा सल्लाही कुमारस्वामी यांनी राज्य सरकारला दिला.