Chandrakant Patil: पालकमंत्र्यांनी साधला पूरग्रस्त कुटुंबांशी संवाद, मदत करण्याचे अश्वासन
पूरबाधित शेतकरी आणि घरामध्ये पाणी गेलेल्या पूरग्रस्तांच्या बरोबर संवाद साधला
वाळवा : कृष्णा नदीला आलेल्या महापुराची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील जुनेखेडला भेट दिली. यावेळी त्यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली व पूरबाधित शेतकरी आणि घरामध्ये पाणी गेलेल्या पूरग्रस्तांच्या बरोबर संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, तालुक्याचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी आबासाहेब पाटील, सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, माजी अॅड. नगराध्यक्ष चिमण डांगे प्रमुख उपस्थित होते.
नवेखेड सरपंच अश्विनी गावडे, उपसरपंच सूरज चव्हाण, जुनेखेडच्या सरपंच प्रियांका पाटील यांनी पूरग्रस्तांच्या समस्या मांडल्या. जुनेखेड गावचे माजी उपसरपंच राहुल पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पूर आल्यानंतर पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी कायमस्वरूपी उपायोजना करण्यासंदर्भात मागणी केली.
यामध्ये प्रताप चौक ते जुनेखेड बिरोबा मंदिराजवळील जुनेखेड ते वाळवा रस्ता जिल्हा मार्ग क्र. ३९ आणि भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागील जुनेखेड ते नवेखेड या रस्त्यांवरील पुलाची उंची प्राधान्याने वाढवण्याची मागणी केली. त्याचबरोबर पूरग्रस्तांना सानूगृह अनुदान, पुरबाधित शेतीसाठी भरीव अनुदानाची मागणी केली.
नवे-जुनेखेड दरम्यान बांधलेल्या वीज कंपनी सब स्टेशनसह नदीकाठी राहणारे गुरव बंधू व मळी भागातील अनेक कुटुंबांशी पालकमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. लोकांनी घरे उंच बांधावीत, पुराचे पाणी येऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजपाचे प्रसाद पाटील, अमोल पडळकर, अर्जुन साळुंखे, सुनील मदने, पार्थ
शहा, प्रवीण देशमुख, युवराज कदम, सतीश जाधव, विनायक जाधव, नितीन पाटील, हणमंत पाटील, नामदेव पाटील, दत्तात्रय पाटील, मोहन पाटील, सोनाली कोळगे, आरुणा पाटील, विमल पवार, रवींद्र चव्हाण, संताजी गावडे, गणेश पाटील, विनायक जाधव, संतोष आंबी, सतीश जाधव दोन्ही गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
शिरगावकडे पालकमंत्र्यांची पाठ !
कृष्णा नदीला येणाऱ्या महापुरात पहिल्यांदा पाण्याचा वेढा पडणारे गाव शिरगाव असून या गावाकडे पालकमंत्र्यांनी पाठ फिरवल्याने शिरगाववासियांनी नाराजी व्यक्त केली. जुनेखेड व शिरगाव हे अंतर नगण्य आहे. शिरगावला जाण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ३६ कोटींचा पूल मंजूर केला आहे. या पुलावरून पालकमंत्री शिरगावला येतील, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांची होती. परंतू पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.