हाती मशाल धरून चंद्रहारला विजयी करा! काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन
भाजपला देशातून हद्दपार करण्यासाठी आघाडीच्या पाठीशी ठामपणे रहा; सांगलीची जागा मित्र पक्षाला गेल्याने दु:ख: पटला नाही तरी काहीवेळा कटू निर्णय घ्यावे लागतात : दृष्ट लावणारे काम करणाऱ्यांना सोडणार नाही
सांगली प्रतिनिधी
भाजपने देशात हिंदु-मुस्लिम धार्मिक वाद निर्माण केला आहे. महागाई आणि बेरोजगारांनी जनता भरडली जात आहे. सलग दहा वर्षात त्यांनी देशाला पिछाडीवर नेले आहे. अशा काळात आता महाराष्ट्रातील 48 च्या 48 जागा जिंकण्यासाठी आघाडीच्या पाठीशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. सांगलीतील जागा शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या हातून निसटून ती मित्र पक्षाकडे गेली आहे. त्याचे मलाही दु:ख आहे, तरीसुध्दा आपण हाती मशाल घेवून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा भावे नाट्यामंदिर आवारात झाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विश्वजीत कदम यांची उपस्थिती होती.
विशालना राज्यसभा, चंद्रहारना विधानपरिषद
नाना पटोले म्हणाले, सांगलीची जागा ही काँग्रेसकडे येण्यासाठी आम्ही अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आहेत. बंडखोरी होवू नये म्हणून विशाल पाटील यांना राज्यसभेची खासदारकी देण्याचा प्रयत्नही केला, तसेचचंद्रहार पाटील यांना विधानपरिषदेची आमदरकी देण्याचा प्रयत्न करून ही बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला. पण बंडखोरी टाळण्यामध्ये आम्ही कमी पडलो असल्याचे त्यांनी कबुली दिली. बंडखोरीचा फटका आघाडीला बसू शकतो. त्यामुळे आता आघाडीतील एक प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रीय सहभागी व्हायचे आहे.
सांगलीची चर्चा दिल्लीपर्यंत
सांगलीच्या जागेचा प्रश्न माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी चांगला दिल्लीपर्यंत नेवून धडकविला होता. सोनिया गांधी यांनी आपणाला सांगलीच्या जागेचा प्रश्न सुटला की नाही असा सवाल केला होता. विश्वजीत कदम यांनी पक्षाची चौकट न मोडता आपली मागणी कशाप्रकारे मांडायची याचे चांगले कार्य सांगलीच्या जागेवरून संपूर्ण देशात दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातही या जागेवरून मोठ्या चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे सांगलीच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केला पण त्यामध्ये आम्हाला यश मिळाले नाही असे सांगतिले.
न भूतो न भविष्यति संघर्ष
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीच्या बैठकीत न भूतो न भविष्यती असा संघर्ष पाहण्यास मिळाला आहे. या जागेवरून संपूर्ण आघाडीची बैठक एक-एक दिवस चालली आहे. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून अनेकवेळा पक्षाच्या नेत्यांनी बहिष्कारही घातला आहे. पण तरीही आम्हाला ही जागा मिळाली नाही. आता ही जागा मित्र पक्षाला गेल्याने आपण आघाडी धर्म पाळून शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा असे चव्हाण यांनी सांगितले.
पण तीन जागांनी त्रास दिला
बाळासाहेब थोरात म्हणाले, आघाडीच्या बैठकीत 40 जागांचा तिढा लगेच सुटला पण उर्वरित आठ जागांवरून तीन महिने घमासान लागले होते. शेवटी तीन जागांवरून वादविवाद झाले त्यामध्ये सांगलीच्या जागेचा समावेश होता. ही जागा काँग्रेसला मिळविता आली नाही. हे खरे आहे. पण त्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्या घडामोडी आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे आता गेलेल्या गोष्टीबद्दल चर्चा न करता आघाडी धर्म पाळावा असे आवाहन त्यांनी केले.
स्वागत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले तर प्रास्ताविक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी केले. तासगाव तालुकाध्यक्ष महादेव पाटील, कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष संजय हजारे, आटपाडी तालुकाध्यक्ष जयदीप भोसले, जत तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग यांनी आपली भूमिका मांडली. आभार इंद्रजित साळुंखे यांनी मानले.
विशाल पाटील यांच्या नावाची घोषणाबाजी
यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्याप्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. माजीमंत्री विश्वजीत कदम यांनी केलेल्या प्रयत्नाला त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सलाम करण्यात आला तर काही कार्यकर्त्यांनी थेट विशाल पाटील यांच्या नावाने घोषणाबाजी केली. विशाल पाटील यांच्याच पाठीशी आपण असल्याचे या कार्यकर्त्यांनी पक्षक्षेष्ठीसमोर दाखवून दिले. त्यामुळे थोडावेळ या मेळाव्यात गोंधळ निर्माण झाला. या घोषणाबाजीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्मितहास्य करून याकडे दुर्लक्ष केले.