Chandrahar Patil: शिवसेना शिंदे गटात प्रवेश?, पै. पाटील थेटच म्हणाले, वेट अॅंड वॉच...
श्रीकांत शिंदे यांनीही पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले होते.
विटा : शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे योग्यवेळी आपण भूमिका जाहीर करू, अशा शब्दात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सध्या तरी वेट अँड वॉच भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, डबल महाराष्ट्र केसरी चंद्राहार पाटील यांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. काहीच दिवसांपूर्वी गलाई बांधवांच्या मेळाव्यासाठी विट्यात आलेल्या उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पै. चंद्रहार पाटील यांच्या राष्ट्रकुल आखड्याला भेट दिली होती.
यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना स्थानिक आ. सुहास बाबर उपस्थित होते. आ. बाबर यांचाही डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी ग्रीन सिग्नल असल्याचे समजते. तत्पूर्वी रत्नागिरी येथेही पै. चंद्रहार पाटील यांनी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उपमुख् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर पै. चंद्रहार यांनी मध्यंतरी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती.
श्रीकांत शिंदे यांनीही पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले होते. एकूणच गेल्या काही दिवसांपासून डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशाच्या बातम्या आणि बैठकांचे सत्र जोरात सुरू आहे. अशातच आता मंत्री संजय शिरसाट यांनी बेधडक चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीखच जाहीर केली. त्यांचबरोबर पक्षप्रवेश रोखून दाखवा, असेही थेट आव्हानही ठाकरे शिवसेनेला दिले.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे ठाकरे यांच्या शिवसेनेत खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून अल्पावधीत परिचित झाले. लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्यासाठी ठाकरे शिवसेनेने सांगलीच्या लोकसभा जागेचा आग्रह धरला आणि त्यांना तिकीटही दिले. यावरून राज्यातील महाविकास आघाडीत बरीच खदखद निर्माण झाली होती.
त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची घोषणा करून मंत्री संजय शिरसाठ यांनी एक प्रकारे खा. संजय राऊत यांनाच आव्हान दिल्याचे मानले जाते. मात्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेना प्रवेशा संदर्भात आपली सहकाऱ्यांसमवेत चर्चा सुरू आहे. नेत्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
राज्यातील क्रीडा क्षेत्रात अनेक सहकारी माझ्यासोबत काम करतात. त्यांच्याशी चर्चा करूनच मी निर्णय घेणार आहे. भविष्याचा विचार करून सहकाऱ्यांसमवेत बोलून योग्य वेळी आपली भूमिका जाहीर करू, असे पैलवान चंद्रहार यांनी 'तरुण भारत संवाद'शी बोलताना सांगितले.
अद्याप अधिकृत भूमिका नाही
माझ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत, मी अधिकृत भूमिका घेतलेली नाही. शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे. पक्षप्रवेश करायचा, पक्ष सोडायचा याबाबतचा निर्णय अजून घेतला नाही. सध्या मी बाहेर गावी असून माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन.
- पै. चंद्रहार पाटील