For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

12 जूनला चंद्राबाबू नायडूंचा शपथविधी

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
12 जूनला चंद्राबाबू नायडूंचा शपथविधी
Advertisement

आंध्रप्रदेशचे चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार तेदेप अध्यक्ष : नरेंद्र मोदींसह रालोआचे नेते राहणार उपस्थित : अमरावतीला राजधानीचा दर्जा देणार

Advertisement

वृत्तसंस्था /अमरावती

तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू हे 12 जून रोजी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत. शपथविधी सोहळा अमरावती येथे पार पडणार असून यात नरेंद्र मोदी तसेच नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य सामील होणार आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा शपथविधी सोहळा यापूर्वी 9 जून रोजी होणार होता, परंतु नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा त्याचदरम्यान होण्याची शक्यता असल्याने तो पुढे ढकलण्यात आला. चंद्राबाबू नायडू हे चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. यापूर्वी त्यांनी 1 सप्टेंबर 1995, 11 ऑक्टोबर 1999 आणि 8 जून 2014 रोजी तीनवेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 2019 मध्ये वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी नायडू यांच्या पक्षाला पराभूत करत सत्ता मिळविली होती. चंद्राबाबू नायडू हे शपथविधीच्या दिनी अमरावतीला राज्याची राजधानी करण्याची घोषणा करू शकतात. 2 जूनपासून हैदराबाद हे केवळ तेलंगणाची राजधानी असणारे शहर ठरले आहे. सध्या आंध्रप्रदेश देशातील एकमात्र असे राज्य आहे, ज्याची कुठलीच राजधानी नाही.

Advertisement

अमरावतीची निवड

अमरावती हे नायडू यांच्यासाठी खास महत्त्व असलेले स्थळ आहे. 2014 मध्ये आंध्रप्रदेशचे विभाजन दोन हिस्स्यांमध्ये होत तेलंगणा राज्य उदयास आले होते.  2014 च्या आंध्रप्रदेश पुनर्रचना कायद्यानुसार हैदराबादच या दोन्ही राज्यांची राजधानी राहिली, परंतु कायद्यानुसार ही स्थिती केवळ 10 वर्षांसाठीच होती. 10 वर्षांनी म्हणजेच 2024 पर्यंत आंध्रप्रदेशने स्वत:ची नवी राजधानी स्थापन करणे अभिप्रेत होते. आंध्रप्रदेशात 2014 साली झालेल्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष विजयी झाला होता, नायडू यांनी मुख्यमंत्री झाल्यावर अमरावतीला राजधानीचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. अमरावतीमध्ये भूमी अधिग्रहण आणि बांधकामेही सुरू झाली होती.

सत्तांतरामुळे राजधानीबाबत गोंधळ

परंतु 2019 मध्ये सत्तांतर होत वायएसआर काँग्रेसचे सरकार आले. तत्कालीन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी अमरावतीच्या जागी राज्यात तीन राजधानी निर्माण करण्याची घोषणा केली. तीन राजधानींच्या घोषणेच्या विरोधात अमरावतीत निदर्शने झाली, हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. उच्च न्यायालयाने मार्च 2022 मध्ये अमरावतीला राजधानीचा दर्जा देण्याच्या बाजूने निर्णय देत सरकार केवळ स्वत:च्या इच्छेमुळे तीन राजधान्या निर्माण करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच न्यायालयाने सरकारला अमरावतीमध्ये सुरू असलेले राजधानी निर्माण करण्याचे कार्य 6 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. परंतु आतापर्यंत आंध्रप्रदेशला स्वत:ची राजधानी प्राप्त झालेली नाही.

आंध्रमध्ये रालोआला बहुमत

2024 विधानसभा निवडणुकीत रालोआला आंध्रप्रदेशात प्रचंड बहुमत मिळाले आहे. विधानसभेच्या 175 जागांपैकी नायडू यांच्या तेदेपने  135, पवन कल्याण यांच्या जनसेनेला 21 आणि भाजपला 8 जागांवर विजय मिळाला. हे तिन्ही पक्ष आघाडी करत निवडणुकीला सामोरे गेले होते. तर जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेसला केवळ 11 जागा जिंकता आल्या आहेत. तर काँग्रेसला राज्यात भोपळाही फोडता आलेला नाही.

Advertisement
Tags :

.