For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'चंदगड व्हाया कळंबा' फॉरेक्स मार्केट घोटाळा! फॉरेक्स मार्केटमधील 'सागर' च्या हाकेला अनेकांची 'साद'

02:00 PM Jul 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
 चंदगड व्हाया कळंबा  फॉरेक्स मार्केट घोटाळा  फॉरेक्स मार्केटमधील  सागर  च्या हाकेला अनेकांची  साद
Forex Market Scam
Advertisement

कोट्यवधी रूपयांचा घोटाळा; शेकडो नागरीकांची कोट्यवधीची गुंतवणूक

कोल्हापूर प्रतिनिधी

गुंतवणूकदारांना भिकेकंगाल करणाऱ्या ए.एस.ट्रेडर्सच्या म्होरक्याच्या कोल्हापूर पोलीसांनी मुसक्या आवळल्या असल्या तरी अद्याप अनेक मार्केटमधील घोटाळेबाज फरार आहेत. 'चंदगड व्हाया कळंबा' असे कनेक्शन असणाऱ्या एका फॉरेक्स मार्केटच्या 'सागर'ने 'साद' घालून कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रूपयांना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे. गुंतवणूक केलेल्या नागरीकांना हजार, दोन हजार रूपयांची रक्कम परत देऊन त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. पण गेल्या अनेक महिन्यांपासून 'तोंड दाबून बुक्यांचा मार' सहन करणारे गुंतवणूकदार आता पोलीसात जाण्याच्या तयारीत आहेत.

Advertisement

फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे झटपट दुप्पट होण्याच्या अपेक्षेने पैसे गुंतवण्यासाठी पुढे आलेल्या नागरीकांचा गैरफायदा घेऊन त्यांना लुटले आहे. यासाठी बोगस कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल केली आहे. आजतागायत अर्थिक फसवणूक करणाऱ्या काही कंपन्यांविरोधात पोलीसांत तक्रार दाखल झाली असली तरी जनसामान्यांची फसवणूक केलेल्या कळंबा परिसरातील एका ट्रेडर्स कंपनीविरोधात लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या फॉरेक्स ट्रेडर्सच्या म्होरक्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी फसवणूक झालेले गुंतवणूदार एकत्र आले आहेत. त्यामुळे या विरोधात लवकरच स्थानिक गुन्हे अन्वेषक शाखेकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.

अनेकांच्या आयुष्याची कमाई 'मार्केट' च्या घशात
अल्पकालावधीत जास्त परतावा मिळवण्याच्या अपेक्षेने गुंतवलेली कोट्यवधी रूपयांची मुद्दलच परत मिळाली नसल्यामुळे अनेकांच्या आयुष्याची कमाई 'मार्केट'च्या घशात गेली आहे. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विविध 'मार्केट' कंपन्यांचा आधार घेत लोकांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. यामध्ये ए.एस.ट्रेडर्स, मेकर ग्रुप, शुभ ट्रेडर्स, गोल्ड लाईफ अशा प्रकारच्या बारा कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चुना लावला आहे. आता मात्र फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी 'साद' घालणाऱ्या म्होरक्याविरुद्ध पोलीसात तक्रार दिली जाणार आहे.

Advertisement

गुंतवणूकदारांकडे धनादेश अन् नोटरी स्टॅम्प
फॉरेक्स मार्केटचा म्होरक्या असलेल्या सागरने गुंतवणूकदारांना गुंतवलेली रक्कम परत देण्याबाबत नोटरी स्टँपवर लिहून दिले आहे. तसेच कोरे धनादेशही दिले आहेत. ही सर्व कागदपत्रे पोलीसात सादर करून गुंतवणूकदार पोलीसात तक्रार करणार आहेत.

Advertisement
Tags :

.